DMK : मोठी बातमी! डिलिमिटेशनसाठी २२ खासदारांनी घेतला मोठा निर्णय; त्या दोन अटी…
DMK : तामिळनाडू राज्याचे माजी मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या डीएमके पक्षाने डिलिमिटेशन विधेयकावर मोठा निर्णय घेतला आहे. स्टॅलिन यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत पक्षाने विधेयकाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

DMK : लोकसभा मतदारसंघ पुनर्रचना (डिलिमिटेशन) विधेयकामुळे ५० टक्के जागा वाढणार आहेत. लोकसभेची सदस्यसंख्या ५५० वरून ८५० पर्यंत नेण्याची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे. मात्र, या विधेयकाला काँग्रेसने तीव्र विरोध दर्शवला असून काही विरोधी पक्षांनी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
तामिळनाडू राज्याचे माजी मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या डीएमके पक्षाने डिलिमिटेशन विधेयकावर मोठा निर्णय घेतला आहे. स्टॅलिन यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत पक्षाने विधेयकाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला आहे.
लोकसभेत २२ खासदारांचे संख्याबळ असलेल्या डीएमकेने या विधेयकाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त समोर आले आहे. डिलिमिटेशन विधेयक मंजूर करून घेण्यासाठी केंद्र सरकारने संसदेच्या विशेष अधिवेशनाचे आयोजन केले आहे. ३० नोव्हेंबरपासून विशेष अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. या विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असली तरी खरी परीक्षा संसदेत दोन-तृतीयांश बहुमत सिद्ध करण्यात असणार आहे.
त्यामुळे एनडीएकडून इतर पक्षांचा पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अशातच २२ खासदारांचे संख्याबळ असलेल्या डीएमकेने पाठिंबा देण्याची भूमिका घेतल्यास सरकारसाठी विधेयकाला मंजुरीसाठी मार्ग आणखी सुकर झाला आहे. लोकसभेत डिलिमिटेशन विधेयक सादर झाल्यावर त्यास मंजुरी मिळाल्यास राज्यसभेतही ते मंजूर करून घेतले जाईल.
स्टॅलिन यांच्या दोन मागण्या मान्य झाल्याची चर्चा
मीडिया रिपोर्टनुसार, डीएमकेच्या खासदारांनी डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली असली तरी दोन प्रमुख मागण्या केल्या आहेत. यामध्ये लोकसभेतील तामिळनाडूचे सध्याचे ७.१८ टक्के प्रतिनिधित्व कायम ठेवणे आणि पुढील २५ वर्षांसाठी सध्याचे प्रतिनिधित्वाचे गुणोत्तर कायम राखणे, या दोन मागण्यांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे.
डीएमकेच्या खासदारांची भूमिका निर्णायक ठरणार?
डीएमकेकडे लोकसभेत २२, तर राज्यसभेत ८ खासदार आहेत. त्यामुळे संसदेतील विधेयकाच्या चर्चेदरम्यान आणि मतदानावेळी पक्षाची भूमिका महत्त्वाची ठरू शकते. दरम्यान, डीएमकेच्या भूमिकेबाबत समोर आलेल्या वृत्तामुळे राष्ट्रीय राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. विशेष अधिवेशनात डिलिमिटेशन विधेयकावर नेमकी काय भूमिका घेतली जाते आणि मतदानावेळी आणखी कोणते पक्ष सरकारच्या बाजूने उभे राहतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.





