शेतकऱ्याचं मोठं नुकसान ! सर्जरीसाठी जमा केलेले 2 लाख रुपये उंदरांनी कुरतडले

हैद्राबाद – देशातील शेतकऱ्यांवर कधी दुष्काळाचं तर कधी अतिवृष्टीचं संकट कायम घोंघावत असतं. त्यामुळे शेतकरी हवालदील होतो. मात्र हैद्राबादमधील शेतकऱ्यावर उंदरांमुळे मोठं संकट ओढवलं आहे.
महबुबाबादमधील वेमुनूर या खेडेगावात रेडिया नाईक नावाचा शेतकरी राहतो. भाजी-पाला पिकवून घर चालवणाऱ्या शेतकऱ्याचे उंदरांनी दोन लाख रुपये कुरतडले. विशेष म्हणजे या शेतकऱ्याने दोन लाख रुपये स्वत:च्या शस्त्रक्रियेसाठी जमवले होते.
रेडिया नाईक यांनी आपल्या घरातील कपाटात २ लाख रुपये ठेवले होते. यामध्ये सर्व पाचशेच्या नोटा होत्या. शेतात पिकवलेला भाजीपाला नाईक आपल्या हातगाडीच्या सहाय्याने विकतात. त्यातून त्यांनी हे पैसे जमवले होते.
दरम्यान त्यांनी पैसे ठेवलेली बॅग उघडून पाहिली. त्यामधील सर्व नोटा त्यांना कुरतडलेल्या दिसून आल्या. हे पाहून त्यांना मोठा धक्का बसला. नाईक यांच्या पोटाची शस्त्रक्रिया करण्याचं नियोजित आहे. त्यामुळे आता काय करायचं असा प्रश्न त्यांन पडला आहे.
कुरतडेलेल्या नोटा घेऊन नाईक बँकेत गेले. त्यावेळी बँकेने देखील नोटा स्वीकारण्यास नाकार दिला. अखेरीस नाईक यांनी आरबीआयचं दार ठोठावलं. मात्र नोटा अर्ध्याहून अधिक कुरतडलेल्या असल्यामुळे जुन्या नोटांच्या मोबदल्यात दुसऱ्या नोटा देणं शक्य नसल्याचं आरबीआयने म्हटलं आहे.





