लोणावळ्यातील धरण साठ्यात मोठी वाढ ! इंद्रायणी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

लोणावळा- लोणावळा शहर आणि परिसरात मागील 10 दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. पावसाचा अजूनही जोर कायम आहे. त्यामुळे लोणावळा शहरात तसेच शहराच्या जवळपास असणारी धरणे, तलाव देखील भरत आली आहेत. रेल्वेच्या मालकीचे भुशी धरण यापूर्वीच ओव्हरफ्लो झाले आहे. टाटा पॉवरच्या लोणावळा धरणात 88 टक्के आणि वलवण धरणात 75 टक्के पाणीसाठा झाला आहे. शिवाय नगरपरिषदेचे तुंगार्ली धरण देखील पूर्ण भरले असून धरणातील ओव्हरफ्लोचे पाणी धरणाच्या मागील कॅनॉलने वलवण धरणाकडे वाहू लागले आहे.
टाटा पॉवरच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणावळा धरण परिसरात गुरुवारी (दि. 27) सकाळी 7 वाजेपर्यंतच्या 24 तासांत 105 मीमी पावसाची नोंद झाली. धरणातील जलसाठा 10.22 द.ल.घ.मी. इतका झाला आहे. धरणात जवळपास 1 हजार क्यूसेकने पाण्याची आवक होत असून धरणाच्या कॅनॉलद्वारे वीजनिर्मिती केंद्राकडे 650 क्यूसेकने पाणी सोडले जात आहे.
हवामान विभागाकडून पुणे घाटमाथ्याला रेड अर्लट देण्यात आल्याने पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाचा जोर वाढल्यास लोणावळा धरण पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यावरून पाणी वाहण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी. तसेच इंद्रायणी नदी पात्रालगत व सखल भागातील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात याव्यात, असे टाटा पॉवरचे धरण प्रमुख बसवराज मुन्नोळ यांनी नगरपरिषद प्रशासनाला कळविले आहे.
नगर परिषदेच्या वतीने जनजागृती
लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने शहराच्या विविध भागांत याबाबत लाऊड स्पीकरद्वारे नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या. शिवाय मुख्याधिकारी पंडित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या बचाव टीम देखील तयार करून त्या सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. लोणावळा शहरात गुरुवारी (दि. 27) सकाळी 7 वाजेपर्यंतच्या एकूण 2865 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षीचा पाऊस केवळ 73 मिलिमीटरने पिछाडीवर असून शुक्रवारी सकाळपर्यंत तो पुढे जाण्याची दाट शक्यता आहे.





