राज्यातील शेतकऱ्यांच्या विदेश अभ्यास दौऱ्याच्या अनुदानात मोठी वाढ

मुंबई : शेतकऱ्यांना जागतिक स्तरावरील प्रगत कृषी तंत्रज्ञान, प्रक्रिया उद्योग, बाजारपेठ आणि उत्पादनवाढीच्या नवीन पद्धतींचे प्रत्यक्ष ज्ञान मिळावे यासाठी राबविण्यात येणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे या योजनेत मोठा बदल करण्यात आला आहे.
आधीच्या एक लाख रुपयांच्या मर्यादेत शेतकऱ्यांना पुरेशी मदत मिळत नसल्याने अनुदान मर्यादा दुप्पट करून २ लाख रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहीती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय कृषी विभागाने जारी केला आहे.
जगातील शेती तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी आपल्या शेतात वापरावे यासाठी परदेशी अभ्यास दौऱ्याचे कृषी विभागामार्फत आयोजन केले जाते. या निर्णयामुळे आता देशाबाहेर अभ्यास दौऱ्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रवास खर्चाच्या ५० टक्के किंवा कमाल रु. २ लाखांपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे.
या अभ्यास दौऱ्यांतून शेतकऱ्यांना अत्याधुनिक यांत्रिकी शेती, ठिबक सिंचन आणि जलव्यवस्थापन, जैविक शेती, कृषी उत्पादन प्रक्रिया व मूल्यवर्धन, कृषी निर्यात आणि विपणन या क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय अनुभव, शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात बचत आणि अधिक उत्पादन आणि दर्जेदार पिकांसाठी नवीन बाजारपेठा उपलब्ध होणार आहेत.
ही योजना २००४-०५ पासून कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांना विदेशात जाऊन तेथील आधुनिक तंत्रज्ञान, शेतीतील यशस्वी मॉडेल्स आणि बाजारपेठीय पद्धतींचा अभ्यास करता यावा, यासाठी या निर्णयाची अंमलबजावणी कृषी आयुक्तालय, पुणे यांच्या माध्यमातून करण्यात येते.





