अदानींच्या शेअर्समध्ये मोठी पडझड; फसवणुकीच्या आरोपानंतर काही सेकंदातच कोट्यवधींचे नुकसान

Adani Group Stocks | भारतीय उद्योजक गौतम अदानी यांच्यावर 250 दशलक्ष डॉलर्सच्या लाचखोरीचे गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणामुळे अदानी समूहाला मोठा धक्का बसला आहे. गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेतील लाचखोरी आणि फसवणुकीच्या आरोपांमुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे. या वृत्तानंतर अदानी समूहाचे सूचीबद्ध शेअर्स भारतीय शेअर बाजारात कोसळले आहे. अदानी समूहाच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांपर्यंत घसरण पाहायला मिळत आहे.
अदानी समूहाचे शेअर्स कोसळले
गुरुवार 21 नोव्हेंबर 2024 रोजी शेअर बाजार उघडताच अदानी समूहाच्या शेअर्स कोसळल्याचे पाहायला मिळाले आहे,. अदानी एनर्जी सोल्युशन्सचे शेअर्स 20 टक्क्यांच्या घसरणीसह उघडले आहेत आणि स्टॉक लोअर सर्किटला लागला आहे. समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसचे शेअर 10 टक्क्यांनी घसरून 2539 रुपयांवर आले आहेत आणि हा शेअरही लोअर सर्किटला लागला आहे.
अदानी पोर्ट्समध्ये 10 टक्के, अंबुजा सिमेंटमध्ये 10 टक्के आणि अदानी पॉवरमध्ये 16 टक्के घट दिसून आली आहे. समूहातील सर्व 10 सूचिबद्ध कंपन्यांचे समभाग प्रचंड घसरले. अदानी टोटल गॅसचे शेअर 14 टक्क्यांनी घसरून 577.80 रुपयांवर, अदानी ग्रीन एनर्जीचे शेअर 18 टक्क्यांनी घसरून 1159 रुपयांवर, एसीसीचे शेअर 10 टक्क्यांनी घसरून 1966.55 रुपयांवर आले.
अंबुजा सिमेंटचे भावही 10टक्क्यांनी घसरले असून शेअर लोअर सर्किटमध्ये आला आहे. तर अदानी विल्मारचा शेअर 8 टक्क्यांनी घसरला आणि 301 रुपयांवर व्यवहार करत आहे. NDTV चे शेअर 9.94 टक्क्यांनी घसरून 152.02 रुपयांवर आले आहेत. अदानी पॉवरचा शेअर 15.34 टक्क्यांनी घसरून 443.70 रुपयांवर आला आहे.
अदानींवर नेमका आरोप काय?
दरम्यान, अदानी आणि त्यांचा पुतण्या सागर अदाणी यांच्यासह इतर सात जणांनी सौर ऊर्जा वितरीत करण्याचे कंत्राट मिळविण्यासाठी भारतातील सरकारी अधिकाऱ्यांना २,०२९ कोटी रुपयांची (२६५ दशलक्ष डॉलर्स) लाच देऊ केली, असा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, बुधवारीच अदानींनी २० वर्षांच्या ग्रीन बाँडच्या विक्रीतून ६० कोटी डॉलर्स उभारण्याची घोषणा केली होती. पण ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार ही फंडरेजिंग योजना रद्द करण्यात आली आहे.





