म्यानमारच्या लष्करी शासनाचा मोठा निर्णय; 3 हजार कैद्यांची शिक्षा माफ करून तुरूंगातून सुटका करणार

बॅंकॉक – म्यानमारमधील लष्करी शासनाने 3 हजार कैद्यांची शिक्षा माफ करण्याचा निर्णय घेतला. म्यानमारमध्ये साजरे केले जाणाऱ्या चांद्रवर्षाच्या प्रारंभाच्या निमित्ताने या कैद्यांची सुटका करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र सुटका केल्या जाणाऱ्या या कैद्यांमध्ये लष्करी शासनाने ताब्यात घेतलेल्या हजारो राजकीय कैद्यांचा समावेश असेल का नाही, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही.
एकूण 3,113 कैद्यांची सुटका केली जाणार आहे. यामध्ये 98 परदेशी कैदी आहेत. सुटकेनंतर त्यांना मायदेशी परत पाठवण्यात येणार आहे, असे म्यानमारमधील सरकारी वृत्तसंस्थेने म्हटले आहे. या कैद्यांच्या सुटकेला आज (सोमवार)पासून सुरुवात केली जाण्याची शक्यता आहे.
म्यानमारच्या लष्करी शासनाने 14,460 राजकीय नेत्यांना ताब्चयात घेतले आहे. यामध्ये माजी राष्ट्रीय समन्वयक आंग सान स्यू की यांचाही समावेश आहे. 1 फेब्रुवारी 2021 पासून म्यानमारमध्ये लष्करी शासनाची राजवट आहे.




