Dattary Bharne : शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय? मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी कृषींमंत्र्यांनी दिले संकेत म्हणाले “चर्चेनंतर…”

Dattary Bharne : राज्यात पावसाचं थैमान सुरूच आहे. मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांना पावसाने चांगलचं झोडपलं आहे. या भागात मोठा पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळित झालं आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याने नद्यांना पूर आला असून पुराचे पाणी नागरिकांच्या घरात शिरले आहे. पावसामुळे बळीराजावर अस्मानी संकट कोसळली आहे.
उभी पिकं पाण्यात डोळ्यादेखत वाहून गेल्याने बळीराज्याच्या डोळ्यांत पाणी आलं आहे. यामुळे राज्यभरातून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. तसेच शेतकरी मदतीसाठी राज्य सरकारकडे मागणी करत आहेत. अशातच आज राज्य मंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठक होत आहे. या बैठकीत मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी महत्वपूर्ण विधान केलं आहे. तसेच त्यांनी राज्यातील पावसामुळे निर्माण झालेल्या स्थितीचा आढावाही सांगितला. 70 लाख एकरवरील पिकांचं मोठं नुकसान झाल्याची माहिती कृषीमंत्र्यांनी दिली. तर नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिल्याचे कृषीमंत्र्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार हे या परिस्थितीवर नजर ठेऊन असल्याची माहिती भरणे यांनी दिली. त्यांनी कॅबिनेट बैठकीपूर्वी माध्यमांशी संवाद साधला.
दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई
संकटाच्या काळी, अडचणीच्यावेळी हे सरकार तुमच्या पाठीशी आहे. पंचनामा करण्याचे काम काही ठिकाणी सुरू आहे. काही ठिकाणी झाले आहेत. तर काही ठिकाणी लागलीच सुरू होईल, अशी माहिती कृषीमंत्र्यांनी दिली. ज्यांचे पंचनामे पूर्ण झाले, त्यांना नुकसान भरपाई देण्यात आली आहे. तर ज्यांचे पंचनामे पूर्ण झाले नाहीत. त्यांना दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई देण्यात येईल अशी घोषणा कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली.
बैठकीनंतर मोठा निर्णय?
शेतकऱ्यांनी मदत करण्यासाठीच्या निकषांवर बोलताना कृषी मंत्री म्हणाले, निकष असले तरी आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत त्यापुढे जाऊन मदत करण्याचा प्रस्ताव आम्ही ठेऊ, अशीही महत्वाची घोषणा त्यांनी केली. ते पुढे म्हणाले, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री चर्चेनंतर काही तरी तोडगा निघेल. चांगला निर्णय होईल, असे संकेत कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आहेत. यामुळे आता मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर काय निर्णय होतो हे पाहणं अत्यंत महत्वाचं असणार आहे.
हेही वाचा : डॅशिंग शिवानी शिवाजी रॅाय पुन्हा भेटीला! ‘मर्दानी 3’ सिनेमाचं दमदार पोस्टर समोर; या दिवशी होणार रिलीज





