पटना – बिहारमधील आरा येथील गोपाली चौकात असलेल्या तनिष्क शोरूममधून सोमवारी 6 चोरट्यांनी 25 कोटी रुपयांचे दागिने लुटले. हल्लेखोरांचा पाठलाग करणाऱ्या पोलिसांनी गोळीबार केला. दोन हल्लेखोरांच्या पायात गोळ्या लागल्या. पोलिसांनी त्यांना पकडले असून त्यांच्याकडून दोन मोठ्या बॅगमधून दागिने जप्त करण्यात आले. उर्वरित दागिने घेऊन 4 चोरटे पळून गेले आहेत. शोरूमचे स्टोअर मॅनेजर कुमार मृत्युंजय म्हणाले, ‘शोरूममध्ये 50 कोटी रुपयांहून अधिक किमतीचे दागिने होते. गुन्हेगारांनी 25 कोटींचे दागिने लुटले. 3 दुचाकीवर आले 6 दरोडेखोर – सोमवारी सकाळी 10.30 वाजता 3 बाईकवर आलेल्या 6 दरोडेखोरांनी शोरूमच्या बाहेर उभ्या असलेल्या गार्डला मारहाण करून त्याचे हत्यार हिसकावले. शोरूममध्ये प्रवेश करताच त्यांनी आतून शटर बंद करून दोन्ही मजल्यांवर सुमारे 22 मिनिटे लूटमार केली. भोजपूरचे एसपी राज म्हणाले, ‘पोलिसांनी शोरूममधील दरोड्याचा फोटो व्हॉट्सॲप ग्रुपवर शेअर केला होता. बाबुरा छोट्या पुलाजवळ बधरा पोलीस स्टेशनला 3 दुचाकीवर 6 संशयित दिसले. त्यांना थांबवल्यावर हल्लेखोरांनी गोळीबार केला. पोलिसांनीही गोळीबार केला. यामध्ये दोन हल्लेखोरांच्या पायात गोळ्या लागल्या आहेत. पोलिसांनी त्यांना पकडले आहे. त्यांच्याकडून 2 पिस्तूल, 10 काडतुसे आणि तनिष्क शोरूममधून 2 मोठ्या बॅगांमध्ये लुटलेले दागिने जप्त करण्यात आले आहेत. विशाल गुप्ता (दिघवारा, जि. सारण) आणि कुणाल कुमार (सेमरा, सोनपूर ) अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत. शोरूमचे गार्ड मनोज कुमार म्हणाले, शोरूम नुकतेच 10 वाजता उघडले होते. त्यानंतर 6 चोरटे 3 दुचाकीवर आले आणि त्यांनी बाईक शोरूमजवळ उभी केली. शोरूमच्या नियमांनुसार, 4 पेक्षा जास्त लोकांना एकत्र प्रवेश करण्याची परवानगी नाही. त्यामुळे पहिले 2 जण आत गेले आणि सहावा चोरटा आत येताच त्याने माझ्या डोक्याला पिस्तूल लावले. त्याने मला मारहाणही केली. रायफलही काढून घेतली. शोरूममध्ये ठेवलेले सोने, चांदी, हिऱ्याचे दागिने बॅगेत भरले होते. दरोड्यादरम्यान चोरट्यांनी सेल्समनलाही मारहाण केली. तनिष्कची सेल्सगर्ल सिमरन म्हणाली, चोरटे सुरक्षारक्षकाला धक्का देत आतमध्ये पोहोचले. मी 20 ते 25 वेळा पोलिसांना फोन केला, पण तत्काळ कारवाई झाली नाही. गाडी येतेय असं नुसतं बोललं जात होतं. दरोडेखोरांची संख्या 10 होती. प्रत्येकाकडे प्रत्येकी दोन शस्त्रे होती. आत येताच त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांचे फोन घेतले आणि त्यांच्या डोक्याला पिस्तुल लावले. यानंतर त्यांनी काउंटरमधील सर्व दागिने घेऊन पळ काढला. दरोड्याची टाइमलाइन – – तनिष्क शोरूम सकाळी 10 वाजता उघडले. – 10.15 वाजता साफसफाईचे काम सुरू झाले. -10.20 वाजता शोरूममध्ये दोन चोरटे घुसले. -10 मिनिटांनंतर बाकीचे चोरटे आत शिरले. -10.50 वाजता सर्वांनी लुटमार करून शोरूममधून पळ काढला. यानंतर पोलिस आले. -11.23 वाजता एसपी आणि एएसपी घटनास्थळी पोहोचले.