एनसीसीमध्ये मोठे बदल! आता केवळ परेड नाही, तर शिकवणार ‘हे’ आधुनिक तंत्रज्ञान..जाणून घ्या

प्रभात वृत्तसेवा
पुणे – मैदानावरील शिस्तबद्ध संचलन आणि खाकी वर्दी हे राष्ट्रीय छात्र सेनेचे (एनसीसी) पारंपरिक चित्र आता बदलणार आहे. बदलत्या काळाची आणि आधुनिक युद्धनीतीची गरज ओळखून एनसीसीच्या अभ्यासक्रमात आमूलाग्र बदल करण्यात येत असून, आता राज्यातील छात्रांना कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), ड्रोन तंत्रज्ञान आणि सायबर सुरक्षेचे प्रगत धडे गिरवता येणार आहेत. विशेष म्हणजे पुढील दोन ते तीन वर्षांत राज्यात एनसीसीचा विस्तार करून २० हजारांहून अधिक नवीन छात्रांना यात सामावून घेतले जाणार आहे.
एनसीसीच्या महाराष्ट्र संचालनालयाचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल विवेक त्यागी यांनी ही माहिती दिली. राज्यात सध्या सात गट मुख्यालयांअंतर्गत सुमारे एक लाख छात्र प्रशिक्षण घेत आहेत. मात्र, अनेक शाळा आणि महाविद्यालयांकडून एनसीसी युनिट सुरू करण्याची मागणी प्रलंबित होती. यावर तोडगा काढत अधिकाधिक संस्थांना मान्यता दिली जाणार आहे. यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांना एनसीसीमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल.
आता केवळ शारीरिक सक्षमता आता पुरेशी नाही, तर तांत्रिक ज्ञानही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे पुढील शैक्षणिक वर्षापासून लागू होणाऱ्या नव्या अभ्यासक्रमात नव्या तंत्रज्ञानावर भर देण्यात आला आहे. ड्रोन हाताळणी, सायबर सुरक्षा आणि एआय, शारीरिक प्रशिक्षणासोबतच मानसिक सक्षमता वाढवणे, राष्ट्रीय सुरक्षेचे प्राधान्यक्रम आणि आपत्ती व्यवस्थापन यांच्याशी सुसंगत प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे ते म्हणाले.
एनसीसीचे ‘सी’ प्रमाणपत्र असलेल्या विद्यार्थ्यांना संयुक्त संरक्षण सेवा (सीडीएस) परीक्षेच्या लेखी परीक्षेतून थेट सूट मिळते. त्यांना केवळ मुलाखतीचा टप्पा पार करावा लागतो. यासाठी प्रत्येक मुख्यालयात विद्यार्थ्यांना मुलाखतीचे विशेष प्रशिक्षण दिले जाईल. तसेच पोलीस भरतीमध्येही सवलती देण्याबाबत राज्य सरकारकडे प्रस्ताव विचाराधीन आहे, अशी माहिती त्यागी यांनी दिली.

