नवी दिल्ली – डिजिटल बाजारपेठेत ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलत, 26 आघाडीच्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सनी डार्क पॅटर्न प्रतिबंध आणि नियमन मार्गदर्शक तत्त्वे, 2023 चे पालन करण्यासंदर्भात स्वयंस्फूर्तीने स्व-घोषणा पत्रे सादर केली आहेत. ग्राहकांची दिशाभूल करणार्या किंवा त्यांना प्रभावित करणार्या फसव्या ऑनलाइन डिझाइन पद्धतींना आळा घालण्याच्या भारताच्या प्रयत्नांमध्ये हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. ग्राहक व्यवहार विभाग अनेक वर्षापासून ई-कॉमर्स कंपन्यातील डार्क पॅटर्न कमी करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. ग्राहकांची दिशाभूल करणारी माहिती ग्राहकांना उपलब्ध होते आणि ग्राहक त्या आधारावर चुकीचे निर्णय घेऊन स्वतचे नुकसान करतात, आता 26 कंपन्यांनी स्वतःबरोबरच तिसर्या पक्षाकडून या संदर्भातील छाननी केली आहे आणि डार्क पॅटर्न नसल्याचे सांगितले आहे. यामुळे देशात कार्यरत इतर ई-कॉमर्स कंपन्याही अशा प्रकारची छाननी करतील आणि डार्क पॅटर्नचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल असे ग्राहक व्यवहार विभागाला वाटते. डार्क पॅटर्नच निर्मूलन करण्यासाठीची आवश्यक नियमावली ग्राहक व्यवहार विभागाने 2023 मध्ये जाहीर केली होती. या प्लॅटफॉर्मनी डार्क पॅटर्न्सची उपस्थिती ओळखण्यासाठी, त्यांचे मूल्यांकन करण्यासाठी आणि त्यांचे उच्चाटन करण्यासाठी अंतर्गत स्वयं लेखा परीक्षण किंवा तृतीय-पक्षीय लेखा परीक्षण केले असून त्यांच्या प्लॅटफॉर्मवर कोणतेही डार्क पॅटर्न्स नाहीत. ते कोणत्याही प्रकारचे ग्राहकांना दिशाभूल करणारे किंवा त्यांना फसवणारे युजर इंटरफेस डिझाइन वापरत नाहीत, असे सर्व 26 कंपन्यांनी जाहीर केले आहे. उद्योगजगताच्या अशाप्रकारच्या सक्रिय अनुपालनामुळे ग्राहकांप्रती पारदर्शकता आणि निष्पक्ष व्यापार तसेच नैतिक डिजिटल परिसंस्थेविषयी दृढ बांधिलकी दिसून येते. त्याचप्रमाणे ग्राहकांचे संरक्षण आणि व्यवसाय वृद्धी एकाच वेळी शक्य असून त्यातून ब्रँड बद्दलचा विश्वास आणि दीर्घकालीन विश्वासार्हता निर्माण होते, असे या स्वयंस्फूर्तीने केलेल्या उपक्रमांतून दिसून येते.