Big Breaking! ‘हिंदुस्थानी भाऊ’ उर्फ विकास फाटकला धारावी पोलिसांकडून अटक

मुंबई : हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास फाटकला अटक करण्यात आली आहे. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. विद्यार्थ्यांना भडकावल्याप्रकरणी विकास फाटकविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज त्याला 11 वाजता कोर्टात हजर केलं जाणार आहे. सोमवारी मुंबई, पुणे आणि नागपुरातील हजारो विद्यार्थ्यांनी दहावी-बारावीची परीक्षा रद्द करण्यासाठी हिंसक निदर्शने केली.
सोशल मीडियावर प्रसिद्ध असणारा हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास पाठकने या विद्यार्थांना दिलेल्या चिथावणीमुळे रस्त्यावर उतरले होते. मुंबईतील धारावी भागात हा ‘हिंदुस्थानी भाऊ’ आला आणि त्याच्या समर्थनासाठी विद्यार्थी मोठय़ा संख्येने रस्त्यावर उतरले आणि पाहतापाहता हिंसक झाले. त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्जदेखील केला.
विद्यार्थ्यांनी आंदोलन केल्याने मुंबई, पुणे आणि नागपूरमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. यानंतर पोलिसांनी हिंदुस्थानी भाऊ आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल केला होता. हिंदुस्थानी भाऊने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर काही व्हिडीओ अपलोड केले होते. यामध्ये त्याने विद्यार्थ्यांना आंदोलनास प्रवृत्त केले.
दहावीची परीक्षा ऑनलाइन घ्यावी, अशी मागणी शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांना करण्यासाठी ‘हिंदूस्थानी भाऊ’ धारावीत आला आणि त्याच्या समर्थनासाठी मोठय़ा संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरले. त्यांनी अंडी, दगड, चपला फेकण्यास सुरुवात केली. अचानक झालेल्या या हुल्लडबाजीमुळे परिस्थिती चिघळू लागली. अखेर पोलिसांनी सौम्य लाठीमार करून विद्यार्थ्यांना पांगवले.
धारावीत जमलेल्या विद्यार्थ्यांमध्ये हुल्लडबाज अधिक होते. बहुतांशी विद्यार्थी मुखपट्टीविना होते. सरकारविरोधात विद्यार्थी अर्वाच्च घोषणा देत होते.‘काही विद्यार्थी हिंसक झाल्याने त्यांच्या दगडफेकीत काही पोलीस जखमी झाले. विद्यार्थ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न पोलीस करीत होते. परंतु विद्यार्थी आक्रमक झाले होते. अखेर पोलिसांना हुल्लडबाजांवर सौम्य लाठीमार करावा लागला,’ अशी माहिती संबंधित पोलीस अधिकाऱ्याने दिली.





