अखेर ती आलीच! अंकिता वालावलकरने खरेदी केली ऑडी, गाडीला दिले ‘हे’ खास नाव

Ankita Walawalkar New Car : ‘बिग बॉस मराठी’च्या 5व्या सीझनमुळे कोकण हार्टेड गर्ल म्हणून ओळखली जाणारी अंकिता वालावलकर महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली आहे. सोशल मीडियावर देखील ती सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांना तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टींबद्दल माहिती देत असते. नुकतेच तिने तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. अंकिताने नवीन गाडी खरेदी केली आहे.
काही दिवसांपूर्वीच अंकिताने तिची जुनी गाडी विकली होती. त्यानंतर आता ऑडी कंपनीची गाडी खरेदी केली आहे. नवीन गाडी खरेदी केल्यानंतरचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. गाडी खरेदी करताना अंकितासोबत तिचा बॉयफ्रेंड कुणाल भगत, बहिण व कुटुंबातील इतर सदस्यही होते.
विशेष म्हणजे अंकिताने तिच्या या गाडीला खास नाव देखील दिले आहे. अंकिताने ‘आवडी आली’, असं कॅप्शन देत गाडीचे फोटो शेअर केले आहेत. तिने तिच्या या लाडक्या गाडीला ‘आवडी’ असे नाव दिले आहे. गाडीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर आता चाहते तिचे अभिनंदन करत आहेत.
दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या 5व्या सीझनच्या माध्यमातून कोकण हार्टेड गर्ल महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली आहे. अंकिता लवकरच बॉयफ्रेंड कुणाल भगतसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. तिने काही दिवसांपूर्वी लग्नाची पत्रिका देखील सोशल मीडियावर शेअर केली होती.





