V. Vijaysai Reddy : वाय.एस.जगनमोहन रेड्डी यांना मोठा धक्का ! व्ही.विजयसाई रेड्डी सोडणार राजकारण

आंध्र प्रदेश : वायएसआर कॉंग्रेस पक्षाचे खासदार व्ही.विजयसाई रेड्डी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देणार आहेत. एवढेच नव्हे तर, राजकारण सोडण्याचा इरादाही त्यांनी जाहीर केला आहे. संबंधित घडामोड आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि वायएसआर कॉंग्रेसचे प्रमुख वाय.एस.जगनमोहन रेड्डी यांच्या दृष्टीने जोर का झटका मानली जात आहे.
विजयसाई यांनी सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातून खासदारकी आणि राजकारण सोडण्याची घोषणा केली. इतर कुठल्याही राजकीय पक्षात मी प्रवेश करणार नाही. कुठले पद, लाभ किंवा पैशांची कुठलीही अपेक्षा न ठेऊन मी संबंधित निर्णय घेतला आहे. तो पूर्णपणे व्यक्तिगत स्वरूपाचा आहे. माझ्या निर्णयावर कुणाचा प्रभाव नाही. कुणीही माझ्यावर दबाव टाकलेला नाही, असे ६७ वर्षीय विजयसाई यांनी स्पष्ट केले.
आंध्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी झाल्या. त्यामध्ये नामुष्कीजनक पीछेहाट झाल्याने वायएसआर कॉंग्रेसला आंध्रची सत्ता गमवावी लागली. त्यानंतर पक्षातील अनेक सहकाऱ्यांनी जगन यांची साथ सोडली. मात्र, विजयसाई यांचा निर्णय संपूर्ण आंध्रला चकित करणारा ठरला आहे. ते वायएसआर कॉंग्रेसचे संस्थापक सदस्य आहेत. जगन यांच्यानंतर पक्षातील दुसऱ्या क्रमांकाचे नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते.





