उद्धवसेनेला मोठा धक्का! सिन्नरमधील राजकीय समीकरणे बदलणार; क्रीडामंत्र्यांचे बंधू हाती कमळ घेणार

Bharat Kokate : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर राज्यात अनेक ठिकाणी मोठे राजकीय भूंकप होताना दिसत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून जोरदार रणनिती आखली जात असून, बड्या नेत्यांना गळाला लावले जात आहे.
आता सिन्नरमधून एक मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. उद्धवसेनेचे भारत कोकाटे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी उद्धवसेनेला जय महाराष्ट्र केला असून लवकरच ते भाजपात पक्षप्रवेश करणार आहेत. विशेष म्हणजे भारत कोकाटे हे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांचे बंधू आहेत.
या घोषणेमुळे सिन्नरमधील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून भारत कोकाटे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाला जय महाराष्ट्र करणार असल्याची जोरदार चर्चा रंगली होती. अखेर ही चर्चा खरी ठरली असून भारत कोकाटेंनी मशालची साथ सोडली असून लवकरच ते हाती कमळ घेणार आहे. हा ठाकरे गटासाठी सर्वांत मोठा धक्का मानला जात आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे मिनी विधानसभा म्हणून पाहिले जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे दौऱ्यावर असताना माध्यमांशी बोलताना स्ट्राँग उमेदवारांना भाजपमध्ये घेतले जाईल, असे विधान त्यांनी केले होते. त्यादृष्टीने भाजपच्या नेत्यांकडून रनणिती आखली जात असून काही दिवसांत राज्यात अनेक ठिकाणी मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कोण आहेत भारत कोकाटे?
- भारत कोकाटे हे राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांचे बंधू आहेत.
- सध्या सिन्नर येथील सोमठाणेच्या सरपंचपदी काम करीत आहेत.
- नाशिक जिल्हा मजूर फेडरेशन आणि विशेष कार्यकारी सोसायटी अशा विविध पदांवर त्यांनी काम केले आहे.
- भारत कोकाटे यांनी २०२२ मध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटात पक्षप्रवेश केला होता.
हेही वाचा : “पाकिस्तानी सैनिक त्यांच्या पँट सोडून पळाले” ; अफगाण सैनिकांनी चौकात बंदुका लटकवून आनंद केला साजरा





