पिंंपरी चिंचवडमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का; जिल्हा संघटिका सुलभा उबाळेंचा पक्षाला अखेरचा जय महाराष्ट्र, शिंदेच्या उपस्थिती पक्षप्रवेश

पिंपरी चिंचवडः पिंपरी चिंचवड शहरात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटातील फायरब्रॅंन्ड म्हणून ओळख असलेल्या शिरुर लोकसभेच्या जिल्हा संघटिका आणि माजी विरोधी पक्षनेत्या सुलभा उबाळे यांनी शिवसेना उबाठाला जय महाराष्ट्र करत शिवसेना शिंदे पक्षाचा धनुष्यबाण हाती घेतला आहे. त्यांच्या सोबत उबाठातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केला आहे. उबाळे गटाचा पक्ष प्रवेश उबाठासाठी मोठा धक्का मानला जात आहे. मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्यांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केला.
विधानसभा निवडणुकीत शहरात एकही जागा शिवसेना उबाठाच्या वाट्याला आली नाही. यामुळे ठाकरे गटात तीव्र नाराजीची पसरली होती. गेल्या तीन महिन्यांपासून उबाळे यांच्या पक्ष प्रवेशाची चर्चा केली जात होती. अखेर काल सायंकाळी त्यांनी एकनाथ शिंदेंच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवसेनेत पक्ष प्रवेश केला आहे. त्यांच्यासह पिंपरी चिंचवड शहरातील अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केला. यावेळी खासदार श्रीरंग बारणे उपस्थित होते. उबाळे यांच्या पक्ष प्रवेशाने ठाकरे गटाला मोठी गळती लागण्याचे पाहायला मिळत आहे.
उबाळे गटाच्या पक्ष प्रवेशासाठी मावळ लोकसभा शिवसेनेचे खासदार यांनी प्रयत्न केला असल्याचे सांगितले जात आहे. त्यांनी ठाकरे गटातील नाराजांना एकत्र करून शिसेनेत आणण्याची खेळी करत राजकीय गणितं साध्य केली आहेत. यामुळे आता शहरात शिवसेना शिंदे पक्षाची ताकद वाढण्यासाठी मोठी मदत होणार आहे.
कोण आहेत सुलभा उबाळे?
सुलभा उबाळे या १९९७ मध्ये पहिल्यांदा महापालिकेवर निवडून आल्या. त्यानंतर तीन वेळा त्यांनी नगरसेविका आणि विरोधी पक्षनेत्या म्हणून कामकाज पाहिले आहे. यमुनानगर महिला मंडळ, दामिनी ब्रिगेड तसेच बचक गटांच्या माध्यमातून त्यांनी मोठे काम केले आहे. हवेली तालुक्याच्या विभाजनानंतर भोसरी विधानसभेसाठी त्यांनी तत्कालीन आमदार विलास लांडे यांना कडवी झुंज दिली होती. केवळ १२०० मतांनी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.





