शरद पवारांना मोठा धक्का; हा आमदार हाती धनुष्यबाण घेण्याच्या तयारीत, थेट भरसभेतून केलं मोठं विधान

MLA Narayan Patil : शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोलापूर जिल्ह्यात धक्का बसण्याची शक्यता आहे. करमाळा तालुक्याचे आमदार नारायण पाटील हे पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहेत. ते शिवसेना शिंदे यांच्या पक्षात जाणार असल्याची जोरदार चर्चा होत आहे.
सोमवारी नारायण पाटील यांनी शिदें सेनेच्या मेळाव्याला हजेरी लावली होती. तसेच पुढील निवडणुका एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढणार असल्याचं मोठं विधान त्यांनी केलं. यामुळे ते लवकरच आपल्या हाती धनुष्यबाण घेणार असल्याचं बोललं जात आहे. त्यांनी केलेल्या या घोषणेमुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात खळबळ उडाली आहे.
सोमवारी शिवसेना नेते आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत करमाळा येथे शिवसेना पदाधिकारी मेळावा पार पडला. या मेळाव्याला आमदार नारायण पाटील यांनी देखील हजेरी लावली होती. तसेच त्यांनी शिवसेनेसोबत काम करणार असल्याचं म्हटलं आहे. भविष्यात एकनाथ शिंदे आणि आम्ही एकत्रच काम करणार आहोत. कुठल्याही गटातटाचा पक्षाचा विचार न करता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढणार असल्याचं करमाळ्याचे आमदार नारायण आबा पाटील यांनी जाहीर केलं. यामुळे नारायण पाटील हे आपल्या हाती धनुष्यबाण घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
कोण आहेत आमदार नारायण पाटील?
महाराष्ट्रातील नावाजलेले पैलवान म्हणून आमदार नारायण पाटील यांचे नाव परिचित आहे. त्यांना कुस्तीत राज्य व राष्ट्रीय पातळीवर विविध पदके मिळाली आहेत. त्यांची राजकीय सुरुवात जेऊर ग्रामपंचायतीच्या सरपंच पदापासून झाली. त्यानंतर ते आमदार म्हणून निवडून आले. कोणताही राजकीय वारसा नसलेले आमदार नारायण पाटील यांनी तालुक्यातील अनेक प्रश्न मार्गी लावले. नारायण पाटील हे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे कट्टर समर्थक मानले जातात.
हेही वाचा : डोनाल्ड ट्रम्प ‘या’ भारतीयांना H-1B व्हिसापासून सूट देणार? ; अमेरिकेची होणार १००,००० डॉलर्सची बचत





