Border-Gavaskar Trophy 2024/25 : टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, केएल राहुलनंतर आणखी एक स्टार फलंदाज दुखापतग्रस्त….

IND vs AUS (Big blow to India) : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेला सुरुवात होण्यासाठी सध्या पाच दिवस बाकी आहेत. पर्थमधील पहिल्या कसोटी सामन्यापूर्वीच भारतीय संघाला एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. शुक्रवारी भारतीय संघांदरम्यान सुरु असलेल्या सराव सामन्यामध्ये भारताच्या लोकेश राहुलच्या उजव्या कोपराला दुखापत झाली त्यानंतर आता युवा फलंदाज शुभमन गिलच्या अंगठ्यालाही दुखापत झाली आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 22 नोव्हेंबरपासून पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. त्याचा पहिला सामना पर्थ येथे होणार आहे. याआधी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. एका रिपोर्टनुसार, सलामीवीर शुभमन गिल दुखापतग्रस्त झाला आहे. क्षेत्ररक्षण करताना गिलला अंगठ्याला दुखापत झाली आहे. पर्थ कसोटीपूर्वी तो तंदुरुस्त न झाल्यास तो पहिल्या सामन्यातून बाहेर पडेल.
गिल टीम इंडियासाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करतो. त्याने भारतासाठी ओपनिंगही केली आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार, शनिवारी क्षेत्ररक्षण करताना शुभमनला दुखापत झाली. त्याच्या हाताच्या अगंठ्याला दुखापत झाली आहे. गिलने अनेक प्रसंगी भारतासाठी चमकदार कामगिरी केली आहे. त्याच्या दुखापतीमुळे संघ व्यवस्थापनाच्या चिंतेत वाढ होऊ शकते. गिलच्या दुखापतीबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. पण भारतीय क्रिकेट नियामक मंडळ येत्या तीन दिवसांत याबाबत माहिती देऊ शकते.
शुभमनच्या अनुपस्थितीत तिसऱ्या क्रमांकावर कोण फलंदाजी करेल?
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा अद्याप पर्थला पोहोचलेला नाही. रोहितची पत्नी रितिका हिने मुलाला जन्म दिला आहे. पण आता रोहित लवकरच ऑस्ट्रेलियाला जाऊ शकतो. तो पोहोचला तर तो यशस्वी जैस्वालसोबत सलामी करू शकतो. गिल बाहेर गेल्यास केएल राहुल किंवा विराट कोहली यांना तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीची संधी मिळू शकते. यापूर्वी कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करायचा. राहुल खालच्या मधल्या फळीतही येऊ शकतो पण त्याच्याही खेळण्याबाबत साशंकता कायम आहे.





