मध्य प्रदेशात काॅंग्रेसला मोठा धक्का ! रामनिवास रावत यांचा भाजपमध्ये प्रवेश

भोपाळ : विद्यमान आमदारकीचा राजीनामा देत पक्षत्याग करायचा; पुढच्याच काही तासांत विरोधी पक्षात सामील व्हायचे आणि पाठोपाठ कॅबिनेट दर्जाचे मंत्रिपदही मिळवायचे ही किमया साधली आहे मध्य प्रदेशचे जुने काॅंग्रेस नेते रामनिवास रावत यांनी. सोमवारी रामनिवास रावत यांनी आपल्या आमदारपदाचा राजीनामा दिला. त्यांनी आपला राजीनामा विधानसभा सचिवालयाकडे पाठवला होता.
त्यानंतर भारतीय जनता पक्षात डेरेदाखल होत रामनिवास रावत यांनी आजच कॅबिनेट मंत्रीपदाची शपथही घेतली. यामुळे मध्य प्रदेश काॅंग्रेस स्त्ंभित झाली असून या वेगवान घटनाक्रमावर आश्चर्य व्यक्त होत आहे. मोहन मंत्रिमंडळाचा दुसऱ्यांदा विस्तार करण्यात आला आहे. त्यामध्ये रामनिवास रावत यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल मंगूभाई पटेल यांनी रामनिवास रावत यांना मंत्रीपदाची शपथ दिली.
या शपथविधीवेळी मुख्यमंत्री डॉ. मोहन यादवही उपस्थित होते. श्योपूर जिल्ह्यातील विजयपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहाव्यांदा आमदार झाले. रामनिवास रावत यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी 30 एप्रिल रोजी भाजपमध्ये प्रवेश केला होता, पण राजीनामा दिला नव्हता. ज्याबाबत काँग्रेस सातत्याने प्रश्न उपस्थित करत होती. अलीकडेच काँग्रेस विधानसभा अध्यक्ष नरेंद्र सिंह तोमर यांच्याकडेही याबाबत तक्रार केली होती.





