मोठी घोषणा ! बच्चू कडूंनी मंत्रीपदावरील दावा सोडला; दिल्लीत एनडीएच्या बैठकीआधी केला निर्णय जाहीर

मुंबई : राज्यात राष्ट्रवादीच्या बंडानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार त्यांच्या ज्येष्ठ नेत्यांना घेऊन शिंदे-भाजप गटात सहभागी झाले. या घटनेमुळे राज्यातील शिंदे गटात असणाऱ्या आमदारांमध्ये प्रचंड नाराजी असल्याच्या चर्चाना उधाण आले होते. त्याचाच प्रत्यय प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांच्या वक्तव्यातून दिसून आला. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर आज बच्चू कडूंनी मंत्रीपदावरील आपला दावा सोडत असल्याची मोठी घोषणा केली आहे.
दिल्लीत एनडीएची बैठक सुरु असून या बैठकीसाठी आमदार बच्चू कडूही दिल्लीत दाखल झाले आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना बच्चू कडू यांनी मोठी घोषणा केली. खरे पाहता १३ जुलै रोजी बच्चू कडूंनी यासंदर्भात संकेत दिले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय जाहीर करणार, असे ते म्हणाले होते. त्यानुसार आज त्यांनी आपला निर्णय जाहीर केला आहे.
मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्याचं बच्चू कडूंनी यावेळी सांगितलं. “४०-५० आमदार आहेत. मंत्रीपदं कमी आहेत. आमदारांमध्ये मंत्रीपदासाठी प्रचंड चढाओढ चालू आहे. या सगळ्यात माझी भूमिका एका मित्राची आहे. त्यांनी दिव्यांग मंत्रालय दिलं ही मोठी बाब आहे. त्यांची अडचण दूर झाली पाहिजे म्हणून मी मंत्रीपदाचा दावा सोडला आहे. त्यांनी आग्रह केला. ते म्हणत होते की तुम्ही आम्हाला मंत्रीपदी हवे आहात. मी त्यांना सांगितलं की एकंदरीत अडचण आहे. माझ्यापेक्षा दुसरं जर कुणी त्या ठिकाणी खूश होत असेल, तर हरकत नाही”, असे बच्चू कडू म्हणाले.
दरम्यान, बच्चू कडूंनी मागच्या गुरुवारी आपली भूमिका स्पष्ट केली होती. ““मी आज मंत्रीपदाचा दावा सोडण्याचा निर्णय घेणार होतो. पण गेल्या मुख्यमंत्री अर्ध्या तासापासून खूप फोन करत आहेत. त्यांनी मला त्यांची भेट घेतल्यानंतर निर्णय घेण्यासंदर्भात विनंती केली आहे. त्यामुळे मी त्यांची विनंती म्हणून आजचा दावा सोडण्याचा निर्णय १८ तारखेपर्यंत पुढे ढकलला आहे. त्यांनी १७ तारखेला भेटण्यासाठी विनंती केली आहे. त्यानंतर १८ तारखेला तुम्हाला हवा तो निर्णय घ्या असे ते म्हणाले आहेत. त्यानुसार मी १८ तारखेला माझा निर्णय जाहीर करेन”, असे बच्चू कडू त्यावेळी म्हणाले होते.
“एकंदरीत सत्ता, पैसा आणि पुन्हा सत्ता या बदलत्या राजकारणाचा आम्हाला कंटाळा आला आहे. सगळं काही पदासाठी नसतं. काही लोक म्हणतात की तुम्हाला आता पद मिळणार नाही वगैरे. मी त्याची पर्वा करत नाही. आमची भूमिका ठाम आहे. आम्ही इथून पुढे दिव्यांगांसाठी, शहीद परिवारांसाठी काम करणार आहे”, असेही ते म्हणाले होते.





