मोठी कारवाई! दिल्लीत ‘त्या’ तरुणीला फरफटत नेणाऱ्या कारच्या मालकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

नवी दिल्ली : दिल्लीत कारखाली आलेल्या अंजली सिंग या तरुणीला चालकाने तब्बल १२ किलोमीटर फरपटत नेल्याने या अपघातात तिचा मृत्यू झाला होता. तसेच तिचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत पोलिसांना आढळून आला होता.
दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली असून गाडी मालक आशुतोषला अटक करण्यात आली आहे. तसेच याप्रकरणी एकूण सहा जणांना अटक करण्यात आल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी १ जानेवारी रोजी पहाटे ४ वाजून ३३ मिनिटांनी रोहिणीतील सेक्टर १ मध्ये पोहोचले होते. यावेळी आशुतोषही तिथे उपस्थित होता. आरोपींनी त्यापूर्वीच फोन करून आशुतोषला अपघाताबाबत माहिती दिली होती. त्यामुळे त्याने आरोपींना पळून जाण्यासाठी ऑटोची व्यवस्था करून दिली होती.
दरम्यान, याप्रकरणात एकूण सात आरोपींचा सहभाग असल्याची माहितीही दिल्ली पोलिसांकडून देण्यात आली आहे. तसेच यापैकी सहा आरोपींना अटक करण्यात आली असून एकाचा शोध सुरू असल्याचेही दिल्ली पोलिसांनी म्हटलं आहे. याबरोबरच बलात्काराचे कोणतेही पुरावे नाहीत, असेही दिल्ली पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.





