NIA action on ISIS Module | मध्य प्रदेशातील ISIS दहशतवाद्यांचे मॉड्युल उद्ध्वस्त

भोपाळ ( NIA action on ISIS Module ) – मध्य प्रदेशात तिघांना अटक करून राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) इसिस या दहशतवादी गटाशी संलग्न एक दहशतवादी मॉड्युल उद्ध्वस्त केले आहे. गुप्तचर विभागाच्या नेतृत्वात मध्य प्रदेश पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकासोबत (एटीएस) राबवलेल्या संयुक्त मोहिमेत जबलपूरमधील 13 ठिकाणी रात्रभरात छापे घालण्यात येऊन तिघांना अटक करण्यात आली, असे एनआयएच्या एका प्रवक्त्याने सांगितले.
सैयद मन्सूर अली, मोहम्मद आदिल खान व मोहम्मद शाहीद अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहे. त्यांना भोपाळ येथील एनआयएच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले असता 3 जूनपर्यत पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे.
या कारवाईत अनेक धारदार शस्त्रे, बंदी घातलेल्या बोअरसह दारूगोळा, आक्षेपार्ह कागदपत्रे आणि डिजिटल उपकरणे जप्त करण्यात आल्याची माहिती संबंधित अधिक-यांनी दिली. खान याच्या इसिसधार्जिण्या कारवाया गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये एनआयएच्या निदर्शनास आल्या होत्या. त्यांचा तपास केल्यानंतर या यंत्रणेने 24 मे रोजी गुन्हा दाखल केला होता.





