Odisha : ओडिशातील सुरक्षा दलांची मोठी कारवाई.! कोटींचे बक्षीस असलेला टॉप कमांडर गणेश उइके चकमकीत ठार

Odisha : ओडिशा पोलीस आणि केंद्रीय सुरक्षा दलांनी राबवलेल्या एका धाडसी संयुक्त कारवाईत नक्षलवादी संघटनेचा सेंट्रल कमिटी सदस्य आणि ओडिशातील नक्षलवादी चळवळीचा मास्टरमाईंड गणेश उइके याला यमसदनी धाडले आहे. या चकमकीत एकूण चार नक्षलवादी ठार झाले असून, यामध्ये दोन महिला नक्षलवाद्यांचाही समावेश आहे.
गुप्त माहितीच्या आधारे ‘मेगा ऑपरेशन’ :
स्पेशल इंटेलिजन्स विंगकडून (SIW) मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांच्या २३ पथकांनी हे संयुक्त ऑपरेशन राबवले. ओडिशा पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुप ची एक छोटी टीम गुम्मा जंगलात गस्त घालत असताना नक्षलवाद्यांशी त्यांची समोरासमोर गाठ पडली. दोन्ही बाजूंनी झालेल्या जोरदार गोळीबारात सुरक्षा दलांनी चार नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले.
नक्षलवादी चळवळीला मोठा धक्का !
‘गणेश उइके‘ हा ठार झालेला मुख्य कमांडर असून त्याच्यावर सरकारने १.१ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. त्याच्या मृत्यूनंतर ओडिशातील नक्षलवादी नेटवर्क पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचे मानले जात आहे. तसेच, चकमकीत ठार झालेल्या दोन महिलांसह अन्य तिघांची ओळख पटवण्याचे काम अद्याप सुरू आहे.
22 Maoists, including 10 women cadres, surrendered before the police in Malkangiri district, Odisha.
The surrender took place in the presence of Odisha Director General of Police, Y B Khurania. It comes after the #Odisha government revised its Maoist surrender and rehabilitation… pic.twitter.com/SzNY41C0NP
— All India Radio News (@airnewsalerts) December 23, 2025
शस्त्रसाठा जप्त आणि सुरक्षा दलांची कामगिरी :
चकमकीनंतर घटनास्थळाचा पंचनामा केला असता पोलिसांना मोठ्या प्रमाणावर युद्धसाहित्य सापडले आहे. एक रिव्हॉल्व्हर आणि एक 303 रायफल. वॉकी-टॉकी सेट्स आणि इतर आक्षेपार्ह साहित्य. सुदैवाने, या घनघोर चकमकीत सुरक्षा दलाची कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
एकाच वेळी दोन मोठे विजय :
योगायोग म्हणजे, ही चकमक घडण्यापूर्वी केवळ २४ तास आधी मलकानगिरी जिल्ह्यात २२ नक्षलवाद्यांनी डीजीपी वाय. बी. खुराना यांच्यासमोर आत्मसमर्पण केले होते. एका बाजूला आत्मसमर्पण आणि दुसऱ्या बाजूला मुख्य कमांडरचा खात्मा, यामुळे नक्षलवाद्यांचे कंबरडे मोडले आहे.
सर्च ऑपरेशन अधिक तीव्र :
या यशस्वी कारवाईनंतर संपूर्ण गुम्मा जंगल परिसरात नाकाबंदी करण्यात आली असून, पळून गेलेल्या इतर नक्षलवाद्यांचा शोध घेण्यासाठी ‘कोम्बिंग ऑपरेशन‘ अधिक तीव्र करण्यात आले आहे.





