मोठी कारवाई! पश्चिम बंगालमध्ये ईडीकडून तब्बल २० कोटींची रोकड जप्त

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये सक्तवसुली संचालनालयाने मोठी कारवाई केल्याची माहिती समोर येत आहे. राज्य सरकारमधील मंत्री पार्थ चटर्जी यांच्या निकटवर्तीय असेलेल्या अर्पिता मुखर्जी यांच्या घरातून तब्बल २० कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.
ईडीकडून जप्त करण्यात आलेली ही रोकड स्कूल सर्व्हिस कमिशन घोटाळ्याशी निगडित असल्याचा संशय ईडीला आहे. ही रोकड मोजण्यासाठी ईडीने बँकेच्या अधिकाऱ्यांना बोलावले आहे. या कारवाईत ईडीने अर्पिता मुखर्जी यांच्या घरातून रोख रकमेसोबतच तब्बल २० मोबाईल देखील जप्त केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळात पार्थ चटर्जी सध्या उद्योग आणि वाणिज्य मंत्री आहेत. एसएससी घोटाळा झाला तेव्हा चटर्जी शिक्षणमंत्री होते. याच चटर्जी यांच्या निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या अर्पिता चटर्जी यांच्या घरावर आज ईडीने धाड टाकली. या कारवाईत ईडीने २० कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. तसेच या रोख रकमेसह पोलिसांनी २० मोबाईल फोन जप्त केले आहेत. जप्त करण्यात आलेली रोकड आणि मोबाईल हे स्कूल सर्व्हिस कमिशनमधील घोटाळ्याशी निगडित असल्याचा संशय ईडीला आहे.
अर्पिता चटर्जी यांच्याव्यतिरिक्त ईडीने शिक्षण राज्यमंत्री परेश सी अधिकारी तसेच आमदार माणिक भट्टाचार्य तसेच अन्य काही व्यक्तींवरही कारवाई केली आहे. पश्चिम बंगालमधील एसएससी घोटाळ्यामध्ये सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये बेकायदेशीर नियुक्त्या करण्यात आल्या, असा आरोप आहे. हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर कोलकाता उच्च न्यायालयाने या घोटाळ्याची चौकशी सीबीआय मार्फत करण्याचे आदेश दिले होते.





