Big Accident : लग्नसोहळ्याहून परतताना कारचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू

रायगड – मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाड तालुक्यातील दासगावच्या हद्दीत शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला आहे. तर कार चालक आणि एक महिला गंभीर जखमी झाले आहेत.
संदीप पाटील, साधना राऊत आणि अनिल राणे असे अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. हे सर्व जण मुंबईहून कणकवली येथे लग्न सोहळ्याला गेले होते. लग्नसोहळा आटोपून मुंबईकडे येत असताना मध्यरात्री 12.45 वाजताच्या सुमारास कार आणि बसची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात संदीप पाटील यांचा जागीच मृत्यू झाला.
तर साधना राऊत आणि अनिल राणे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच कार चालक दीपक पाटील आणि सुगंधा पाटील हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातात मृत्यू पावलेले संदीप पाटील हे कारचालक दीपक पाटील यांचे सख्खे भाऊ होते. या अपघाताची नोंद महाड शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.





