Pimpri : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासासाठी सायकलची साथ

पिंपरी : सातारा जिल्ह्यातील शेंबडी आणि बामणोली या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचा प्रवास सोपा करण्याच्या उद्देशाने एक्सआयटी ग्रुपने दिलासादायक पाऊल उचलले आहे. डोंगराळ भागातील विद्यार्थी दररोज 7 किलोमीटरचा पायी प्रवास करून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शेंबडी आणि न्यू इंग्लिश स्कूल, बामणोली या शाळांमध्ये पोहोचत होते.
या ग्रुपने विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करून त्यांच्या शैक्षणिक प्रवास सुकर केला आहे.नव्या कोर्या सायकली पाहून हे विद्यार्थीदेखील हरखून गेले.एक्सआयटी ग्रुपचे सीईओ रोहित कांबळे यांनी विद्यार्थ्यांच्या समस्यांची दखल घेत तातडीने मदतीचा निर्णय घेत विद्यार्थ्यांना नव्या कोर्या सायकली उपलब्ध करुन दिल्या.
सायकल वितरण कार्यक्रम शेंबडी व बामणोली गावात मोठ्या उत्साहात पार पडले. या वेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शेंबडीचे शिक्षक श्री. राऊत सर आणि न्यू इंग्लिश स्कूल, बामणोली चे शिक्षकवर्ग उपस्थित होते. गावकर्यांनी एक्सआयटी ग्रुपचे आभार मानत त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले.
हा उपक्रम केवळ विद्यार्थ्यांसाठी नाही, तर संपूर्ण समाजासाठी सकारात्मक संदेश देणारा आहे. सायकलींच्या मदतीने विद्यार्थ्यांचा वेळ वाचेल, प्रवास सुलभ होईल, आणि त्यांना अभ्यासासाठी अधिक वेळ मिळेल. यामुळे या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच समाजाच्या विकासालाही चालना मिळेल.





