Bibvewadi Murder Case : सलून मालकाचा भावाच्या डोळ्यादेखत मृत्यू; बिबवेवाडीत त्या रात्री नक्की काय घडलं? वाचा
Bibvewadi Murder Case : स्वतःचे सलून सुरू करणे पडले महागात; जुन्या मालकासोबत झालेल्या वादात तरुणाने गमावला जीव, पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड.

Bibvewadi Murder Case – बिबवेवाडी परिसरात सलून व्यवसायाच्या वादातून झालेल्या मारहाणीमध्ये २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी बिबेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिघांना अटक करण्यात आली आहे. मृताचे नाव मोहम्मद शमी (२५) असे आहे.
तर फिर्यादी मोहम्मद सलमान फिरोज कुरेशी (वय १८) व्यवसाय-साई स्मार्ट हेअर सलून, अप्पर जुना बस स्टॉप, बिबवेवाडी, पुणे यांनी याबाबत तक्रार दिली आहे. फिर्यादी हे मयताचे भाऊ असून, दोघेही मूळचे प्रयागराज येथील रहिवासी आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद शमी हा गेल्या दोन वर्षांपासून आरोपी सौरभ चोरगे यांच्या सलूनमध्ये काम करीत होता.
काही दिवसांपूर्वी त्याने गावाला जात असल्याचे सांगितले; मात्र प्रत्यक्षात गावाला न जाता त्याने स्वतःचे सलून सुरू केले. तसेच, आरोपीकडील काही ग्राहकांना स्वतःकडे वळवू लागल्याने दोघांमध्ये वाद निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर आरोपी सौरभ चोरगे व त्याचे मित्र अनिकेत सराटे आणि रोहित बालशंकर हे शमीकडे जाऊन जाब विचारण्यासाठी गेले असता त्यांच्यात तीव्र वाद झाला.
वादाचे रूपांतर मारहाणीत झाले असून तिघांनी शमीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. या मारहाणीमध्ये शमी गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करीत सौरभ चोरगे, अनिकेत सराटे आणि रोहित बालशंकर या तिघांना अटक केली आहे.




