Bhuvneshwar Kumar Record : पुनरागमनात महागडा ठरूनही भुवनेश्वर कुमारचा मोठा पराक्रम! टिम साउदीचा मोडला वर्ल्ड रेकॉर्ड
Bhuvneshwar Kumar Record : बऱ्याच कालावधीनंतर भारतीय संघात पुनरागमन केलेल्या अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने क्राइस्टचर्च स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात एक मोठा विक्रम केला आहे.

Bhuvneshwar Kumar Breaks Tim Southee World Record for Most Dot Balls in T20I Powerplay : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला थरारक सामना क्राइस्टचर्चच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने २२६ धावांचे महाकाय आव्हान ४ गडी राखून यशस्वीरीत्या पूर्ण केले. या लढतीत सर्वांचे लक्ष तब्बल चार वर्षांनंतर राष्ट्रीय टी-२० संघात पुनरागमन करणाऱ्या भारताचा स्विंग मास्टर भुवनेश्वर कुमार याच्यावर केंद्रित होते. गोलंदाजीत त्याला अपेक्षित लय मिळवता आली नाही आणि तो महागडा ठरला; तरीही एका ऐतिहासिक विक्रमाला गवसणी घालत त्याने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये नवा जागतिक विक्रम आपल्या नावावर नोंदवला.
टिम साउदीचा विक्रम मोडला; पॉवरप्लेमध्ये ६८० डॉट बॉल्स
आयपीएलमधील सातत्यपूर्ण चमकदार कामगिरीच्या जोरावर भुवनेश्वरने भारतीय संघात पुन्हा स्थान मिळवले होते. वेस्ट इंडिजविरुद्धच्या घरच्या मालिकेत त्याला खेळण्याची संधी मिळाली होती, मात्र पावसाने सामना वाया गेला होता. आता न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या लढतीत भुवीने ४ षटकांत एकही विकेट्स न मिळवता तब्बल ४९ धावा दिल्या. मात्र, या दरम्यान त्याने पॉवरप्लेमध्ये टाकलेल्या दोन षटकांत ४ निर्धाव (डॉट) चेंडू टाकले. यासह आयसीसीच्या पूर्ण सदस्य (Full Member) देशांमध्ये पॉवरप्लेदरम्यान सर्वाधिक ६८० डॉट बॉल टाकण्याचा जागतिक विक्रम त्याने प्रस्थापित केला. त्याने न्यूझीलंडचा माजी दिग्गज टिम साउदीचा ६७९ डॉट बॉल्सचा विक्रम मागे टाकला.
आंतरराष्ट्रीय टी-२० पॉवरप्लेमधील अव्वल गोलंदाज (फुल मेंबर्स संघ):
🚨BHUVI STARTED WHERE LEFT 🚨
Bhuvneshwar Kumar first over for India after 4 long years ☠️ https://t.co/0KjMpHtV9J
— Kashif (@KashifNdmCric) October 22, 2026
- भुवनेश्वर कुमार (भारत) : ६८० डॉट बॉल
- टिम साउदी (न्यूझीलंड) : ६७९ डॉट बॉल
- रिचर्ड नगारवा (झिम्बाब्वे) : ६७४ डॉट बॉल
- शाहीन शाह आफ्रिदी (पाकिस्तान) : ६२५ डॉट बॉल
- ब्लेसिंग मुझारबानी (झिम्बाब्वे) : ६१४ डॉट बॉल
- अर्शदीप सिंग (भारत) : ५७६ डॉट बॉल
- जसप्रीत बुमराह (भारत) : ५६९ डॉट बॉल
दुसऱ्या टी-२० सामन्यात दमदार कमबॅकची अपेक्षा –
पहिल्या सामन्यात धावा रोखण्यात अपयश आले असले तरी न्यूझीलंडमधील खेळपट्ट्या आणि हवामान भुवनेश्वरच्या स्विंग गोलंदाजीसाठी अत्यंत अनुकूल मानले जाते. त्यामुळे २४ ऑक्टोबर रोजी क्राइस्टचर्च येथेच खेळवल्या जाणाऱ्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भुवी आपल्या जुन्या लयीत परतून किवी फलंदाजांना आपल्या स्विंगने अडचणीत आणेल, अशी आशा भारतीय क्रिकेट चाहत्यांना आहे.





