भुशी धरण ओव्हरफ्लो: लोणावळ्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी पर्वणी

लोणावळा: लोणावळा शहरात रविवारी (दि. १५) रात्रीपासून पावसाची संततधार सुरू असून येथील पर्यटनाचे मुख्य आकर्षण असलेले भुशी धरण सोमवारी (दि. १६) पहाटेच्या सुमारास ओव्हरफ्लो झाले आहे. लोणावळा शहरात येणाऱ्या पर्यटकांची पंढरी म्हणून अनेकदा उल्लेख केले जाणारे हे धरण ओसंडून वाहू लागल्याने शहरात पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांसाठी ही एक पर्वणी ठरत आहे.
मे महिन्यात पडलेल्या पावसामुळे भुशी धरणातील पाणीसाठा वाढला होता आणि मागील एक आठवड्यापासून हे धरण ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर होते. त्यामुळे पर्यटक आणि येथील व्यावसायिक मोठ्या आतुरतेने त्या क्षणाची वाट बघत होते. मात्र मागील दोन दिवसांत पावसाचा जोर कमी राहिल्याने ही प्रतीक्षा लांबली होती. पण अखेर पावसाने रविवारी मध्यरात्री पासून सोमवारी सकाळपर्यंत चांगलाच जोर पकडल्याने भुशी धरण ओव्हरफ्लो होऊन वाहू लागले.
मागील काही तास सलग पडणाऱ्या पावसामुळे येथील डोंगर भागातून धबधबे वाहू लागले आहेत. रविवारी सकाळी सात ते सोमवारी सकाळी सात वाजेपर्यंत २४ तासात लोणावळा शहरात १४३ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
गतवर्षीपेक्षा १४ दिवस आधीच धरण ओव्हरफ्लो
मागील वर्षी ३० जूनच्या दिवशी भुशी धरण ओव्हरफ्लो झाले होते. त्यामानाने यंदा लवकरच म्हणजे १६ जून रोजीच धरण ओव्हरफ्लो झाले आहे. इथून पुढे पाऊस वाढण्याची शक्यता असल्याने लोणावळ्यात पावसाळी पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना धरणाच्या पायऱ्यांवरून फेसाळत वाहणाऱ्या पाण्याचा आनंद घेता येणार आहे. तसेच आगामी शनिवारी रविवारी वीकेंडला लोणावळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.





