Bhushi Dam : लोणावळ्यातील भुशी धरणात मोठी दुर्घटना ! 2 तरुणांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

लोणावळा : पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या लोणावळ्यातील भुशी धरणात रविवारी (दि. ८) दुपारी दोनच्या सुमारास एक दुर्दैवी घटना घडली. उत्तर प्रदेशातील दोन तरुण पर्यटक मोहम्मद जमाल आणि साहिल शेख यांचा धरणाच्या बॅकवॉटर परिसरात पाण्यात बुडून मृत्यू झाला. हे दोघेही मूळचे मिरजापूर, उत्तर प्रदेश येथील रहिवासी असून, सध्या पुण्यातील थेरगाव येथे कामानिमित्त राहत होते. ते त्यांच्या आठ सहकाऱ्यांसह वर्षाविहारासाठी भुशी धरणावर आले होते.
घटनास्थळी जाण्यास रेल्वे विभागाने तारांचे कंपाउंड लावून बंदी घातली असली, तरी काही उत्साही पर्यटकांनी कंपाउंड तोडून मार्ग बनवला होता. या मार्गाने गेलेल्या दोन तरुणांना ही दुर्घटना भोवली. घटनेची माहिती मिळताच लोणावळा शहर पोलीस, शिवदुर्ग मित्रचे आपत्कालीन पथक आणि स्थानिक तरुणांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. अर्ध्या तासाच्या प्रयत्नांनंतर दोन्ही तरुणांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले. पावसाळ्यात भुशी धरण पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरते, परंतु अशा घटनांमुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.
भुशी धरण ओव्हरफ्लोच्या उंबरठ्यावर
लोणावळ्याचे प्रमुख पर्यटनस्थळ असलेले भुशी धरण सध्या ८० ते ८५ टक्के भरले असून, ते ओव्हरफ्लो होण्याच्या उंबरठ्यावर आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे धरणातील पाण्याची पातळी वाढली आहे. यंदाच्या पावसाळ्यात धरण ओव्हरफ्लो होण्याच्या अपेक्षेने या वीकेंडला मोठ्या संख्येने पर्यटक धरणावर दाखल झाले. धरण पूर्णपणे भरले नसले, तरी निसर्गरम्य वातावरण आणि साचलेल्या पाण्यामुळे पर्यटकांनी समाधान व्यक्त केले. येत्या आठवड्यात पाऊस कायम राहिल्यास पुढील वीकेंडपर्यंत धरण पूर्णपणे ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे.





