मोठी बातमी ! माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या घरावर ईडीचे छापे ; सकाळपासून अनेक ठिकाणी धाडसत्र

Bhupesh Baghel-ED raids। छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि त्यांचा मुलगा चैतन्य बघेल यांच्याशी संबंधित अनेक ठिकाणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सोमवारी छापे टाकले. मनी लाँड्रिंग प्रकरणाशी संबंधित कथित दारू घोटाळ्याच्या संदर्भात हा छापा टाकण्यात आला. भिलाई येथील चैतन्य बघेल यांच्या घरांवर तसेच राज्यातील इतर अनेक व्यक्तींशी संबंधित ठिकाणांवर मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) छापे टाकण्यात आले. केंद्रीय एजन्सीने पहाटे भूपेश बघेल यांच्या घरावर छापा टाकला असल्याची माहिती समोर आली आहे.
दारूच्या सिंडिकेटने गुन्ह्यातून कोट्यवधींची लूट Bhupesh Baghel-ED raids।
छत्तीसगड दारू घोटाळ्यामुळे राज्याच्या तिजोरीचे मोठे नुकसान झाले, तर दारूच्या सिंडिकेटने गुन्ह्यातून २,१०० कोटी रुपयांहून अधिक रक्कम लुटल्याचा आरोप ईडीने केला आहे. या प्रकरणात राज्य सरकारी अधिकारी आणि व्यावसायिकांसह अनेकांना आधीच अटक करण्यात आली आहे.
छत्तीसगड दारू घोटाळ्याच्या प्रकरणाची ईडी चौकशी करत आहे. या प्रकरणाबाबत ईडी आणि एसीबीमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला होता. नोंदवलेल्या एफआयआरमध्ये २ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त घोटाळ्याचा उल्लेख करण्यात आला होता. ईडीला त्यांच्या तपासात असे आढळून आले की, तत्कालीन भूपेश सरकारच्या काळात आयएएस अधिकारी अनिल तुटेजा, उत्पादन शुल्क विभागाचे एमडी एपी त्रिपाठी आणि उद्योगपती अन्वर ढेबर यांच्या सिंडिकेटद्वारे हा घोटाळा करण्यात आला होता.
छापा का टाकण्यात आला?
भूपेश बघेल यांचा मुलगा चैतन्य बघेल याच्या घरावरही केंद्रीय एजन्सीने छापा टाकल्याचे सांगण्यात येत आहे. आर्थिक अनियमितता आणि मनी लाँड्रिंगच्या संदर्भात ही कारवाई करण्यात आली आहे. ईडीच्या पथकाने माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या भिलाई थ्री मानसरोवर कॉलनीतील बंगल्यावर छापा टाकला आहे. ईडीचे पथक सकाळी 7:00 वाजता तीन इनोव्हा कारमधून आले. बंगल्यात ईडीची कारवाई सुरू आहे. काँग्रेसचे लोक बाहेर जमू लागले आहेत.
पैसे कमावण्याचे आरोप कसे केले गेले? Bhupesh Baghel-ED raids।
२०१९-२३ या कालावधीत मिळवलेल्या बेकायदेशीर नफ्यामध्ये अनिल तुटेजा हा अविभाज्य भाग होता, असा दावा एजन्सीने केला आहे. हे पैसे डिस्टिलर्सकडून घेतलेल्या लाचेतून आणि सरकारी दारू दुकानांकडून देशी दारूच्या बेहिशेबी विक्रीतून आल्याचा आरोप आहे. तथापि, गेल्या वर्षी ८ एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयाने छत्तीसगडमधील २००० कोटी रुपयांच्या कथित दारू घोटाळ्यात तुतेजा आणि त्यांचा मुलगा यश यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगचा खटला रद्द केला होता आणि म्हटले होते की यात गुन्ह्यातून मिळालेल्या रकमेचा समावेश नाही.





