Nagar | कर्जत-जामखेडमध्ये भूमिपुत्र विरुद्ध लफंगा सामना

जवळा (वार्ताहर)- ज्या अजितदादांनी रोहित पवारांना मोठं केलं, त्यांच्याप्रति त्यांची द्वेषाची भावना आहे. माझ्यासारख्या ज्येष्ठ माणसालाही तो चंगूमंगू म्हणतो, मग तुम्ही आम्ही कोण ? यंदा कर्जत-जामखेडमध्ये भूमिपुत्र विरुद्ध लफंगा असा सामना होणार आहे.
रोहित पवार हा लफंगा असून, हा लफंगा तिकडून येऊन आपल्याला मतं मागत फिरतोय. याला बारामतीला पाठवण्यासाठी जनतेने सज्ज व्हावे, असे आवाहन भाजपचे ज्येष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात यांनी केले.
आमदार प्रा. राम शिंदे यांनी जनसंवाद पदयात्रेच्या माध्यमातून जामखेड तालुका पिंजून काढला. त्यांच्या या पदयात्रेला जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.
जवळा गावात जनसंवाद पदयात्रेच्या पहिल्या टप्प्याची सांगता झाली. तत्पूर्वी जवळा ग्रामस्थांच्यावतीने पुष्पवृष्टी करून पदयात्रेचे जंगी स्वागत करण्यात आले.
जवळा येथे पदयात्रा काढण्यात आली. त्यानंतर जवळा बसस्थानकासमोर सांगता सभा संपन्न झाली. यावेळी ज्येष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात बोलत होते. यावेळी आमदार प्रा. राम शिंदे यांच्यासह महायुतीचे सर्व नेते व पदाधिकारी उपस्थित होते.
आ. शिंदे म्हणाले, जवळा परिसराच्या विकासासाठी मंत्री असताना २८ कोटी तर विधानपरिषदेवर गेल्यावर २२ कोटींचा निधी दिला. मागच्या निवडणुकीत जी चूक झाली ती यंदा करू नका.
मतदारसंघातील जनतेवर कधीच अन्याय होऊ देणार नाही, असे सांगत जलसंधारण मंत्री असताना मतदारसंघात जलयुक्त शिवारची प्रचंड कामे केली.
या कामांची विरोधकांनी चौकशी लावली. पण त्यात काहीच आढळले नाही. आपण केलेल्या याच कामांची साळसूळ करून त्यांनी मात्र सीएसआरचे पैसे हडपले. आता याच कामांची मी चौकशी लावणार आहे, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
कुकडीचे पाणी आणणारच : शिंदे
आमदार राम शिंदे यांचे भाषण सुरू असताना जनतेतून सतत कुकडीच्या पाण्यावर बोला, असा आवाज यायचा.
त्यावर बोलताना शिंदे म्हणाले, कुकडीचे शेतीसाठी पाणी जामखेड तालुक्यात आणू म्हणणार्यांनी मागच्या पाच वर्षात कुकडीचे नाव सुद्धा काढले नाही.फक्त राम शिंदेच कुकडीचे पाणी जामखेडला आणून दाखवीन, असे म्हणताच उपस्थितांनी एकच जल्लोष केला.




