भूमि पेडणेकरने प्लास्टिक सर्जरीच्या आरोपांवर दिली प्रतिक्रिया म्हणाली, “प्रत्येकाची स्वतःची पसंती असते”

Bhumi Pedanekar: अभिनेत्री भूमी पेडणेकरवर सोशल मीडियावर अनेकदा आरोप केले जातात की तिने चेहऱ्यावर सर्जरी, बोटॉक्स किंवा फिलर्स केले आहेत. अनेक वर्षांपासून या अफवांवर ती मौन बाळगत होती, मात्र अलीकडेच तिने यावर स्पष्ट भूमिका मांडली आहे.
सिनेसृष्टीत बोटॉक्स, फिलर्स आणि कॉस्मेटिक सर्जरीबाबत अनेकदा चर्चा होते. काही कलाकारांना या गोष्टींसाठी टीकेचा सामना करावा लागतो. अलीकडे ‘द रॉयल्स’ या वेबसीरीजमध्ये भूमी झळकली. ते पाहून युजर्सनी पुन्हा एकदा तिच्यावर बोटॉक्स आणि फिलर्सचे आरोप केले. या पार्श्वभूमीवर भूमीने एका मुलाखतीत यावर प्रतिक्रिया दिली.
भूमी पेडणेकर हिने एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले कि, “माझ्या मते प्रत्येकाची स्वतःची एक निवड असते. आपण अशा काळात जगतोय जिथे प्रत्येकाला स्वतःच्या पसंतीने जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. लोकांच्या निवडीवर मत द्यायला मी कोण आहे ?” त्यानंतर भूमी म्हणाली,“माझ्या मते या विषयावर खूप जास्त चर्चा केली जाते. काही वेळा हे आवश्यकही नसते.”
आहारात तूप घेण्यावर भूमीचा विश्वास
कॉस्मेटिक सर्जरीच्या चर्चेबरोबरच भूमीने तिच्या आहारातील सवयींबद्दलही सांगितले. ती म्हणाली, “खुप लोक तुपाला घाबरतात, पण माझ्या आहारात एक गोष्ट हमखास असते ती म्हणजे तूप . मी खूप प्रमाणात तूप घेते. पण फरक एवढाच आहे की मी तुपामध्ये अन्न शिजवत नाही. मी ते अन्नावर वरून घालते. चपाती, इडलीवर वगैरे. अशा पद्धतीने तूप घेतल्यास आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.”
भूमीने स्किन केअरचे टिप्सही शेअर केले
याआधी भूमीने तिच्या स्किन केअर रुटीनबाबतही माहिती दिली होती. ती रोज क्लिंझिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग म्हणजेच सीटीएम फॉर्म्युला फॉलो करते. कितीही व्यस्त वेळापत्रक असले तरी ती हे रुटीन चुकवत नाही. त्याचबरोबर भरपूर पाणी पिणे आणि पुरेशी झोप घेणे हेसुद्धा तिच्या त्वचेच्या आरोग्याचं रहस्य असल्याचं तिने सांगितलं.





