गोंदियातील ध्वजारोहणास भुजबळांचा नकार; ‘या’ मंत्र्याकडे दिली जबाबदारी

मुंबई : एका बाजूला रायगड व नाशिक जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये तणाव निर्माण झाला असताना, स्वातंत्र्यदिनी कोणत्या जिल्ह्यात कोणता मंत्री ध्वजारोहण करणार यावरुन देखील नाराजीनाट्याला सुरुवात झाली आहे. येवला मतदार संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मंत्री छगन भूजबळ यांना नाशिक जिल्ह्यात ध्वजारोहणाची संधी न मिळाल्याने ते नाराज आहेत. शासनाच्या वतीने त्यांना गोंदिया येथे ध्वजारोहण करण्यासंदर्भात सूचित करण्यात आले होते. मात्र, त्यांनी ऐनवेळी नकार कळवल्याने, त्यांच्या ऐवजी मंत्री मंगलप्रभात लोढा गोंदियामध्ये ध्वजारोहण करणार आहेत. या संदर्भात नवे परिपत्रक शासनाकडून जाहीर करण्यात आले आहे.
गोंदियाचे पालकमंत्रीपद राष्ट्रवादीचे बाबासाहेब पाटील यांच्याकडे आहे. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांच्या गुडघ्याची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीमध्ये त्यांना हालचाल करणे शक्य होणार नाही, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे बाबासाहेब पाटील उपलब्ध नसल्याचे त्यांनी कळवले आहे. त्यामुळे ध्वजारोहणाची जबाबदारी भुजबळांकडे सोपविण्यात आली होती. मात्र, मंत्री छगन भूजबळ यांनी तब्येतीच्या कारणास्तव या शासकिय प्रस्तावास नकार कळवला.
नाशिक व रायगड या दोन्ही जिल्ह्यांमध्ये अनुक्रमे मंत्री गिरीश महाजन व आदिती तटकरे हे ध्वजारोहण करणार आहेत. रायगडमधून आदिती तटकरेंचे नाव पुढे आल्याने, मंत्री भरत गोगावले देखील नाराज असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे पुणे व बीड या दोन जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद आहे. अजित पवारांनी सातत्याने पुण्यामध्ये ध्वजारोहण केलेले आहे. मात्र, यावेळी ते बीडमध्ये ध्वजारोहण समारंभास उपस्थित राहणार असून पुण्यातील ध्वजारोहण राज्यपालांच्या हस्ते करण्यात येणार आहे.





