Bhor Taluka : भोरच्या दुर्गम भागातील एसटी थांब्यांची दुरावस्था; प्रवाशांचा जीव धोक्यात
Bhor Taluka : भोर तालुक्यातील वेळवंड आणि हिरडस मावळ खोऱ्यातील एसटी बस थांब्यांची दुरावस्था झाली आहे. शेवाळ, तुटलेले बाक आणि झाडी-झुडपांमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Bhor Taluka : भोर तालुक्यातील वेळवंड आणि हिरडस मावळ खोऱ्यातील अनेक एसटी बस थांब्यांची दुरवस्था झाली असून, प्रवाशांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. दुर्गम आणि डोंगराळ भागातील या बस थांब्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
सततच्या पावसामुळे बस थांब्यांच्या परिसरात शेवाळ साचले आहे. अनेक ठिकाणी प्रवाशांसाठी बसविण्यात आलेले बाक तुटलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे बसची वाट पाहताना प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
त्यातच बस थांब्यांच्या परिसरात वाढलेल्या गर्द झाडी-झुडपांमुळे विषारी सापांचा वावर वाढला आहे. त्यामुळे प्रवाशांना जीव मुठीत धरून बसची प्रतीक्षा करावी लागत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, एसटी महामंडळ आणि स्थानिक प्रशासनाने या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन वेळवंड व हिरडस मावळ खोऱ्यातील बस थांबे सुस्थितीत करावेत, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.





