पुणे : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील उत्रौली (ता. भोर) गावातील श्वेता सुनील शिंदे हिची लंडन येथील नामांकित क्रॅनफील्ड युनिव्हर्सिटी मध्ये एरोस्पेस व्हेहिकल डिझाईन या उच्च अभ्यासक्रमासाठी निवड झाली असून, तिच्या या उल्लेखनीय यशाने संपूर्ण परिसर अभिमानाने न्हावून निघाला आहे. श्वेताने बी.टेक. एरोस्पेस इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर, पुण्यातील संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO), खडकी तसेच भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) येथे इंटर्नशिप केली. इस्रोच्या लाईव्ह स्पेस डॉकिंग प्रोजेक्ट मध्ये तिने सक्रिय सहभाग नोंदवला असून, तिच्या नावावर शैक्षणिक उत्कृष्टतेसाठी सुवर्णपदकाचाही मान आहे. श्वेताने विविध आंतरराष्ट्रीय परीक्षांमधून कठोर परिश्रमाने अनेक टप्पे पार केले आणि अखेर तिची निवड प्रतिष्ठित क्रॅनफील्ड युनिव्हर्सिटीमध्ये झाली आहे. या यशानंतर श्वेता शिंदेच्या नातेवाईकांसह संपूर्ण पंचक्रोशीतील नागरिकांकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. श्वेताचे हे यश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून, तिच्या माध्यमातून उत्रौलीसह भोर तालुक्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकले आहे.