Bhor News: भोरकरांच्या आरोग्याशी खेळ! पाणी शुद्धीकरणासाठी चक्क ‘मुदतबाह्य’ पावडरचा वापर?
Bhor News: भोर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या फिल्टर हाऊसमध्ये घाणीचे साम्राज्य; १३ कामगार असूनही ८ ते १० दिवसांत स्वच्छता होत नसल्याचे चित्र.

Bhor News – भोर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्रात (फिल्टर हाऊस) शेवाळाचा जाड थर साठल्याचे समोर आले असून, केंद्रात चक्क मुदतबाह्य शुद्धीकरण पावडरच्या गोण्या आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या अशुद्ध आणि दूषित पाण्यामुळे शहरात रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून, नगरपालिकेच्या कारभारावर नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
भोर शहराच्या पाणीपुरवठ्याची जबाबदारी एका ठेकेदाराकडे असून, त्यांतर्गत १३ कामगार कार्यरत आहेत. या कामगारांच्या वेतनापोटी नगरपालिका दरमहा २ लाख २७ हजार ५०० रुपये मोजत आहे. “आमचे कामगार दर ८ ते १० दिवसांनी फिल्टर बेडची (कमळांची) स्वच्छता करतात,” असा दावा ठेकेदाराने केला होता. मात्र, स्थानिक पत्रकारांनी प्रत्यक्ष जलशुद्धीकरण केंद्राला भेट देऊन पाहणी केली असता, फिल्टरच्या कमळांवर शेवाळाचा मोठा थर साठल्याचे उघड झाले.
यामुळे ठेकेदाराचा स्वच्छतेचा दावा फोल ठरला आहे. केंद्रात पाणी शुद्धीकरणासाठी वापरण्यात येणाऱ्या पावडरच्या अनेक गोण्या मुदत संपलेल्या स्थितीत आढळून आल्या आहेत. या मुदतबाह्य पावडरमुळे पाण्याचे योग्य शुद्धीकरण होत नसल्याने भोरकरांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात लहान मुलांमध्ये पोटदुखी, उलट्या आणि गॅस्ट्रोचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले असल्याचे खाजगी डॉक्टरांनी सांगितले.
“जलशुद्धीकरण केंद्रात मुदतबाह्य पावडरच्या गोण्या आढळल्या असल्यास त्या तातडीने बाजूला करून नवीन साठा उपलब्ध केला जाईल. सद्यस्थितीत शहराला स्वच्छ पाणी देण्याचा प्रयत्न सुरू आहे. केंद्रात अस्वच्छता आढळल्याप्रकरणी संबंधित ठेकेदाराला कारणे दाखवा नोटीस बजावून खुलासा मागवण्यात येईल. ठेकेदार दोषी आढळल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल.”
– गजानन शिंदे, मुख्याधिकारी, भोर नगरपरिषद.





