Bhor Crime: पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातून माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका ६५ वर्षीय नराधमाने चार वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून, संतप्त गावकऱ्यांनी पुणे-बेंगलोर महामार्गावर रास्ता रोको केला आहे. नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, पीडित चिमुकली ही सुट्ट्या घालवण्यासाठी नसरापूर येथील आपल्या आजी-आजोबांकडे आली होती. दुपारी ती घरासमोर खेळत असताना, गावातीलच ६५ वर्षीय आरोपी भीमा कांबळे याने तिला फूस लावून गोठ्यात नेले. तिथे तिच्यावर अत्याचार केल्यानंतर, पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याने चिमुकलीची दगडाने ठेचून हत्या केली आणि तिचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवून ठेवला. CCTV मुळे नराधमाचा चेहरा समोर – मुलगी बराच वेळ न दिसल्याने कुटुंबीयांनी तिची शोधाशोध सुरू केली. सायंकाळच्या सुमारास गोठ्यात तिचा मृतदेह आढळल्यानंतर खळबळ उडाली. गावकऱ्यांनी परिसरातील CCTV फुटेज तपासले असता, आरोपी चिमुकलीला गोठ्याच्या दिशेने घेऊन जाताना स्पष्टपणे दिसला. या तांत्रिक पुराव्याच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपी भीमा कांबळे याला तातडीने ताब्यात घेतले आहे. महामार्गावर संतापाचा उद्रेक – या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच गावकऱ्यांचा संयम सुटला. संतप्त नागरिकांनी चिमुकलीचा मृतदेह पोलीस स्टेशनसमोर ठेवून निदर्शने केली. आरोपीला कठोर शासन व्हावे या मागणीसाठी पुणे-बेंगलोर महामार्गावर नसरापूर परिसरात रास्ता रोको करण्यात आला. यामुळे खेडशिवापूर टोल नाका ते कापूरहोळपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. उद्या ‘भोर’ बंदची हाक – या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी उद्या गाव कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आरोपीवर जलदगती न्यायालयात खटला चालवून त्याला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. पोलीस प्रशासन सध्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत असून महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू आहे.