Bhor Accident: सरत्या वर्षात हृदयद्रावक अपघात; मायलेकाला मोटारीने उडवले; दोघेही जागीच ठार

प्रभात वृत्तसेवा
महुडे – सरत्या वर्षाच्या अखेरच्या दिवशी भोर- कापूरहोळ मार्गावरील आळंदे ते कासुर्डी दरम्यान दुचाकीवरील मायलेकाला मोटारीने उडवल्याने ते दोघे जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना दि.३१ रोजी दुपारी पावणेदोनच्या दरम्यान घडली.अमृत लक्ष्मण धावले (वय २८) आणि नंदा लक्ष्मण धावले (वय ५५, रा.तेलवडी, ता.भोर) असे दुर्दैवी मायलेकाचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी, मृत अमृत आणि त्याची आई आळंदे येथील शेतातील काम उरकून तेलवडी (ता.भोर) येथील आपल्या घरी दुचाकीने (एम एच १२ पी.व्ही. ८०६९) चालले होते. दरम्यान भोरहून कापूरहोळच्या दिशेने सुसाट वेगाने जाणाऱ्या चारचाकी मोटारीने (एम एच १२ व्ही एन ०१०१) दुचाकीला मागील बाजूने जोरात धडक दिली.
दोघेही दुचाकीसह रस्त्याच्या कडेला खड्ड्यात पडून डोक्याला जोरदार मार लागल्याने जागीच त्यांचा मृत्यू झाला. मोटारीमध्ये ३ तरुण असल्याचे कळते. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र राठोड यांच्यासह पोलीस हवालदार राजेंद्र घायाळ यांनी घटना स्थळी धाव घेत जगदगुरू नरेंद्र महाराज सेवा ट्रस्ट नाणीज रुग्णवाहिका चालक तुळशीराम अहिरे यांच्या मदतीने जखमींना नसरापूर येथील हाॅस्पिटलमध्ये दाखल केले.
मात्र, उपचारापूर्वीच दोघांचा मृत्यू झाला. मोटारीतील तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून मोटार चालकासह तिघांनी मद्यप्राशन केल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. मात्र, सरत्या वर्षाला निरोप देताना हुल्लडबाज तरुणांनी मद्य प्राशन करून गाडी चालविल्याने निष्पाप मायलेकाचा मृत्यू झाल्याने आळंदे, तेलवडी तसेच कासुर्डी परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.





