देऊळवाडीत वीज उपकेंद्राचे भूमिपूजन

पालकमंत्री राम शिंदे यांचे प्रयत्न

कर्जत – पणन व वस्त्रोद्योग मंत्री तथा पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या प्रयत्नातून कर्जत तालुक्‍यातील देऊळवाडी येथे 400 केव्ही उपकेंद्र उभारले जाणार आहे. 17 हेक्‍टर जागेत हा प्रकल्प उभारला जात असून गुरुवारी (दि.22) देऊळवाडी (सिद्धटेक) येथे दुपारी 1 वाजता ऊर्जा व राज्य उत्पादन शुल्क मंत्री ना. चंद्रशेखर वावनकुळे यांच्या हस्ते, पणन व वस्त्रोद्योग मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा भूमिपूजन सोहळा आयोजित केला आहे.

महापारेषण कंपनीचे राज्यात सर्वत्र वीजेचे पारेषण करिता 765 केव्ही, 500 केव्ही, 400 केव्ही, 220 केव्ही आणि 132 केव्हीचे उपकेंद्र आणि वाहिन्यांचे जाळे कार्यरत आहे. प्रस्तावित 400/ 220 केव्ही कर्जत उपकेंद्र व संलग्न 400 केव्ही व 220 केव्ही वाहिन्यांची कामे मंजुर झालेली आहेत. या प्रकल्पाकरिता 368. 72 कोटी रुपये एवढया रकमेस प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. या उपकेंद्रामुळे 220 केव्ही वाहिन्यांची लांबी कमी होणार असुन त्यामुळे बिघाड कमी होतील. दुरूस्तीही कमीत कमी वेळेत होईल.

मुख्यतः 220 केव्ही अहमदनगर व 220 केव्ही भोसे (बेलवंडी) उपकेंद्र जोडली जाऊन अहमदनगर जिल्हयातील कर्जत, श्रीगोंदा व जामखेड तालुक्‍यांमध्ये भविष्यात येणारी वीजेची मागणी पुर्ण करण्यासाठी व योग्य दाबाने अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी 400 केव्हीच्या देऊळवाडी उपकेंद्राचा फायदा होईल. याव्यतिरिक्त सोलापुर व पुणे जिल्ह्यातील 220 केव्ही जेऊर, भिगवन व 220 केव्ही कुरकुंभ ही उपकेंद्रही जोडली जाऊन 400 केव्ही उपकेंद्रातून त्यांना वीज पुरवठा केला जाईल. या 400 केव्ही उपकेंद्रावर 1000 एम. व्ही. ए एवढा विद्युतभार अपेक्षित आहे.

या प्रकल्पाच्या उभारणीनंतर अहमदनगर, पुणे, सोलापुर जिल्ह्यांतील सुमारे 5 लक्ष वीज ग्राहकांना या प्रकल्पाचा लाभ मिळणार आहे. या उपकेंद्र भूमीपुजन कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन महापारेषणच मुख्य अभियंता जयंत वीके, अधीक्षक अभियंता प्रवीण भालेराव, अधीक्षक अभियंता शरद लोखंडे, अधीक्षक अभियंता किशोर जाधव आणि प्र. अधीक्षक अभियंता दीपक पाटील यांनी केले आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×