Bhimashankar | श्रावण सोमवारी लाखो भक्तांची रांग ; ऐतिहासिक मंदिरे आणि निसर्गसौंदर्याचा मिलाफ..

प्रभात वृत्तसेवा
मंचर – श्री क्षेत्र भीमाशंकर येथे तिसऱ्या श्रावण सोमवारी सव्वादोन लाख भाविकांनी भीमाशंकर महाराज की जयच्या घोषात ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले. मंदिर परिसर जयघोषाने दुमदुमला.श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर आणि गाभारा येथे फुलांची सजावट मंचर येथील उद्योजक अनिल लबडे यांनी केली. मुखदर्शन बारीमुळे भाविकांना दर्शन सुविधा उपलब्ध होत आहेत. सह्याद्रीच्या कुशीतील बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे पवित्र स्वयंभू ज्योर्तिर्लिंग हे प्राचीन काळापासून हेमाडपंथी शैलीचे मंदिर आहे.
येथे शिवपार्वती हे अर्ध्या भागात वसल्याने नटेनारेश्वर असेही म्हटले जाते.येथे भीमा नदीची उत्पत्ती शंकराच्या घामापासून झाली आहे. त्यामुळे भीमेचे उगमस्थानच येथे आहे. पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेऊन पायऱ्यांनी वर आल्यावर कळमजाई मातेचे मंदिर आहे. तेथील दर्शन घेतल्यानंतरच पुर्ण दर्शन होते,अशी आख्यायिका आहे. अनेक हौशी पर्यटक कर्जत खांडस मार्गे गणेश घाट, शिडी घाटामार्गे पायी मोठ्या प्रमाणावर भाविक भीमाशंकरला येतात. भीमाशंकर मंदिर व जंगल परिसरात अनेक ऐतिहासिक वास्तू व ठिकाणे आहेत.
यामध्ये मंदिराबाहेर असलेली पोर्तुगीज काळातील घंटा, घंटेला लागून असलेले शनि मंदिर, मंदिराजवळचे गोरक्षनाथ मंदिर, पायऱ्यांच्या सुरुवातीला असलेले कमलजादेवी मंदिर ही प्राचीन मंदिरे आहेत. यात पावसाळी पर्यटनासाठी अतिशय उत्तम ठिकाण,निसर्गाची मुक्त उधळण या परिसरात पहावयास मिळते. भीमाशंकर जंगलात अनेक पाहण्यासारखी प्रेक्षणीय स्थळे आहेत.
या ठिकाणी असलेल्या सर्वांत उंच अशा नागफणी टोकावर गेल्यावर कड्याच्या तळापर्यंत खेटलेली मुंबईच्या आजूबाजूची गावे, पदरचा किल्ला, तुंगी, कळवंतीचा महाल, माथेरानची पर्वत रांग, घोणेमाळ, सिध्दगड, असा परिसर दिसतो. भीमाशंकर येथे महाशिवरात्र, श्रावण महिना, चातुर्मास, त्रिपुरारी पौर्णिमा या काळात उत्सव साजरे केले जातात. वाहनतळ ते भीमाशंकर बसस्थानकापर्यंत एसटी महामंडळाने भाविकांची जाण्या-येण्यासाठी एसटी बसची सोय केली आहे,अशी माहिती वाहतूक नियंत्रण टी. एन. पवळे यांनी दिली.




