Bhimashankar | श्रीक्षेत्र भीमाशंकरच्या विकासासाठी २८८.१७ कोटी रुपयांचा आराखडा मंजूर

प्रभात वृत्तसेवा
राजगुरूनगर – श्रीक्षेत्र भीमाशंकर विकास आराखडा (कुंभमेळा २०२७-गर्दी व्यवस्थापन आणि इतर सोयी-सुविधा) या विकास आराखड्यास उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून राज्य शासनाने आज २८८.१७ कोटी रुपयांची मंजुरी दिली आहे, अशी माहिती खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी दिलीयोजनेंतर्गत मंदिर परिसर, वाहनतळ, भाविक सुविधा केंद्र, शौचालये, लॉकर, दुकाने, बस स्थानक व दिव्यांगांसाठी सुलभ व्यवस्था अशा विविध पायाभूत सुविधा विकसित होणार आहेत.
यामध्ये निगडाळे येथे भाविक सुविधा केंद्र व वाहन तळासाठी 163 कोटी, श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिर परिसर विकास 90 कोटी व राजगुरुनगरकडील मार्ग व श्री कोटेश्वर मंदिराचा जिर्णोद्धार यासाठी 33 कोटी रुपये, निगडाळे येथे होत असलेल्या वाहनतळावर 2000 चार चाकी वाहने, 200 मिनी बस, पाच हजार दुचाकी वाहने यांच्याकरता वाहनतळ, भाविकांकरता वेटिंग हॉल, स्नानगृह, शौचालय, लॉकर सुविधा, दुकाने निर्माण केली जाणार आहे.
भीमाशंकर बस स्थानक व ज्योतिर्लिंग मंदिर परिसर यामध्ये बस स्थानकाचा पुनर्विकास, राम मंदिर व दत्त मंदिर पुनर्बांधणी, दिव्यांगांसाठी इलेक्ट्रिक वाहन दिल्या जाणार आहेत. राजगुरुनगरकडून नवीन मार्ग व श्री कोटेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार ट्रेकिंग वॉकिंग आदी कामे केली जाणार आहेत.विकास आराखड्यामुळे भाविकांना आधुनिक व सुसज्ज सुविधांचा लाभ मिळणार असून भविष्यातील गर्दीचे प्रभावी व्यवस्थापन करता येणार आहे.
श्रीक्षेत्र भीमाशंकर हे महाराष्ट्रातील एक पवित्र ज्योतिर्लिंग क्षेत्र असून भाविकांची सुरक्षितता, सुलभता आणि अध्यात्मिक अनुभूती यासाठी शासनाने घेतलेले हे पाऊल ऐतिहासिक आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पास मंजुरी मिळाल्याने संपूर्ण परिसराच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारी ठरेल.
वेळेत आराखड्याची अंमलबजावणी..
मोहिते म्हणाले की, श्रीक्षेत्र भीमाशंकर विकास आराखड्यात गर्दी व्यवस्थापन, पायाभूत सुविधा, सार्वजनिक सुविधा, भाविकांच्या सोयीसाठी आवश्यक प्रत्येक बाबींचा समावेश आहे. जिल्हाधिकारी यांना संनियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्त करून आराखड्याची अंमलबजावणी ठरलेल्या कालमर्यादेत पार पाडण्यासाठी स्पष्ट कार्ययोजना आखली आहे. ज्यामुळे कुंभमेळा २०२७ चे आयोजन सुरळीत आणि सुरक्षित होईल, असा मला पूर्ण विश्वास आहे.
भाविकांना प्रत्येक सुविधेचा लाभ..
उच्चाधिकार समितीच्या शिफारशीवर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समिती आणि राज्य सरकारने या विकास आराखड्यास अंतिम मान्यता दिल्यामुळे भाविकांना प्रत्येक सुविधेचा लाभ मिळणार आहे. श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखड्याला उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून मंजुरी मिळाल्याचे खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी सांगितले.





