Bhavaninagar : श्री छत्रपती साखर कारखान्यात मिल रोलर पूजन; 12 लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट
Bhavaninagar: गुरुपुष्य अमृत योगाच्या मुहूर्तावर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्यात सन २०२६-२७ च्या गळीत हंगामासाठी मिल रोलरचे पूजन संचालक अनिल काटे आणि सतीश देवकाते यांच्या हस्ते करण्यात आले.

Bhavaninagar (भवानीनगर) : गुरुपुष्य अमृत योगाच्या मुहूर्तावर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्यात सन २०२६-२७ च्या गळीत हंगामासाठी मिल रोलरचे पूजन संचालक अनिल काटे आणि सतीश देवकाते यांच्या हस्ते करण्यात आले. आगामी हंगामात १२ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील सुमारे १८ हजार एकर क्षेत्रावरील ऊसाची नोंदणी पूर्ण झाली असून कार्यक्षेत्राबाहेरील ऊस नोंदणीचे काम सुरू आहे. ऊस उपलब्धतेचा अंदाज लक्षात घेऊन गाळपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आवश्यक ऊसतोड व वाहतूक यंत्रणा उभारण्याचे काम सुरू असून दररोज आठ हजार मेट्रिक टनांहून अधिक ऊस गाळपाचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार मशिनरीची देखभाल व दुरुस्तीची कामे वेगाने सुरू असून संचालक मंडळाकडून त्याचा सातत्याने आढावा घेतला जात आहे.
‘वजन चोख, पैसे रोख’ –
मागील गळीत हंगामात कारखान्याने ‘वजन चोख, पैसे रोख’ ही संकल्पना यशस्वीपणे राबविली. त्यानुसार गाळप झालेल्या उसाचे संपूर्ण पेमेंट ऊस उत्पादकांना वेळेत अदा करण्यात आले. तसेच ऊसतोडणी, वाहतूक, कमिशन व डिपॉझिटची देयकेही संबंधित कंत्राटदारांना अदा करण्यात आली आहेत. आगामी हंगामासाठी करार व कागदपत्रांची पूर्तता केलेल्या ऊसतोड-वाहतूक कंत्राटदारांना अॅडव्हान्सच्या पहिल्या हप्त्याचे वाटप लवकरच करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.
यावेळी कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक आणि उपाध्यक्ष कैलास गावडे यांनी सभासद व बिगरसभासद शेतकऱ्यांना नोंदणीकृत सर्व ऊस कारखान्याकडे गाळपासाठी देण्याचे आवाहन केले. कारखान्याला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सभासदांनी सहकार्य करावे, असेही त्यांनी नमूद केले.
टप्प्याटप्प्याने निर्यात सुरू ठेवावी
देशातील सहकारी साखर उद्योग सध्या आर्थिक संकटाचा सामना करीत असल्याचे सांगताना अध्यक्ष जाचक म्हणाले की, देशांतर्गत बाजारात साखरेचे दर स्थिर आहेत. साखर निर्यात बंद असल्याने अतिरिक्त साठा निर्माण होऊन दर घसरण्याची भीती आहे. गेल्या सात वर्षांत साखरेचा किमान विक्री दर (एमएसपी) वाढलेला नसताना ऊसतोडणी, वाहतूक, मजुरी, वीज, पाणी आणि उत्पादन खर्चात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे केंद्र शासनाने एफआरपी वाढीबरोबरच साखरेचा एमएसपीही वाढवावा तसेच साखर निर्यात धोरणाचा फेरविचार करून टप्प्याटप्प्याने निर्यात सुरू ठेवावी, अशी मागणी त्यांनी केली.
कार्यक्रमास संचालक अॅड. शरद जामदार, रामचंद्र निंबाळकर, शिवाजी निंबाळकर, पृथ्वीराज घोलप, गणपतराव कदम, प्रशांत दराडे, अजित नरुटे, विठ्ठलराव शिंगाडे, बाळासाहेब कोळेकर, संतोष मासाळ, निलेश टिळेकर, अशोक पाटील, मंथन कांबळे, डॉ. योगेश पाटील, तानाजी शिंदे, सुचिता सपकळ, माधुरी राजपुरे, कार्यकारी संचालक अशोक जाधव, जनरल मॅनेजर हनुमंत करवर, तांत्रिक सल्लागार महादेव निकम, इंचार्ज चीफ इंजिनिअर निखिल रणवरे, चीफ केमिस्ट अमर जगताप, डेप्युटी चीफ इंजिनिअर आण्णासाहेब कदम, मुख्य शेतकी अधिकारी जालिंदर शिंदे, कामगार नेते युवराज रणवरे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.





