Bhavana Gawali: ‘मी अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार’, तिकीट कापल्यानंतर भावना गवळी यांचा आक्रमक पवित्रा

Bhavana Gawali – यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाबाबत शिंदे गटाने बुधवारी महत्त्वाचा निर्णय घेतला. गेल्या पाच टर्मपासून यवतमाळच्या खासदार असलेल्या भावना गवळी यांचे तिकीट कापून त्यांच्याऐवजी हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील (Rajashree Patil) यांना यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. राजश्री पाटील गुरुवारी यवतमाळ लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज दाखल करणार आहेत.
दरम्यान, भावना गवळी यांना एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हंटले आहे की, मी यवतमाळ-वाशिम मतदारसंघावरील दावेदारी अद्याप सोडलेली नाही. मी आता माझ्या मतदारसंघामध्ये परत जात आहे. मी यवतमाळ-वाशिममधून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे, असे त्या म्हणाल्या. त्यामुळे आता भावना गवळी या महायुतीच्या अधिकृत उमदेवार राजश्री पाटील यांच्याविरोधात बंडखोरी करुन अर्ज भरणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. भावना गवळी यांनी खरोखरच अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यास राजश्री पाटील यांच्यासमोर मोठे आव्हान निर्माण होऊ शकते.
उमेदवारीसाठीचे प्रयत्न ठरले फोल –
यवतमाळ-वाशिममधून पुन्हा उमेदवारी मिळण्यासाठी भावना गवळी यांनी गेल्या काही दिवसांपासून राजकीय भेटीगाठी घेत होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दोन्ही बड्या नेत्यांशी चर्चा केली. यवतमाळ-वाशिममध्ये उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आज मुंबईत निर्णय होणार, याची जाणीव भावना गवळी यांना होती. त्यामुळे भावना गवळी शेवटपर्यंत एकनाथ शिंदे यांच्याशी बोलून आपले तिकीट वाचवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, बुधवारी संध्याकाळी शिंदे गटाकडून राजश्री पाटील यांना यवतमाळ-वाशिममधून उमेदवारी अर्ज भरण्याचा आदेश देण्यात आला आणि भावना गवळी यांचे सर्व प्रयत्न फोल ठरले.





