‘इंटरपोल’नंतर आता ‘भारतपोल’ ! परदेशात पळून गेलेल्या गुन्हेगारांच्या सरकार मुसक्या आवळणार ; जाणून घ्या ‘भारतपोल’ कसे काम करणार ?

Bharatpol । भारत सरकार गुन्हेगार आणि दहशतवाद्यांच्या विरोधात आपली पकड सतत घट्ट करताना दिसून येत आहे. मात्र अनेकवेळा गुन्हेगार देशात गुन्हा करून परदेशात पळून जातात, अशा स्थितीत त्यांची माहिती काढण्यासाठी राज्य पोलिसांना बराच कालावधी लागतो. कारण यामध्ये कागदोपत्री कामामुळे सर्व गोष्टी लांबणीवर पडतात. मात्र आता भारत सरकारने गुन्हेगारांवरील कारवाईला गती देण्यासाठी नवी यंत्रणा सुरु केली आहे. ‘भारतपोल’ या नावाने नवीन पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलद्वारे अनेक गुन्हेगारांना आळा घालण्यात येणार आहे. मात्र हे पोर्टल नेमकं काम कस करणार हे जाणून घेऊ…
गुन्हेगार आणि दहशतवाद्यांविरोधातील कारवाई अधिक तीव्र करणार Bharatpol ।
देशातील सर्व सुरक्षा यंत्रणा गुन्हेगारांवर सतत लक्ष ठेवून असतात. मात्र अनेक वेळा गुन्हेगार घटना घडल्यानंतर राज्य बदलतात, तर काही वेळा गुन्हेगार देश सोडूनही निघून जातात. अशा परिस्थितीत सुरक्षा यंत्रणांना त्यांची माहिती गोळा करण्यासाठी लांबलचक कागदपत्रांची प्रक्रिया पार पाडावी लागते किंवा दुसऱ्या देशातून इंटरपोलची मदत घ्यावी लागते. एवढ्या सगळ्या वेळात गुन्हेगार इतरत्र पसार होऊन जातात. यावरच तोडगा काढण्यासाठी गृह मंत्रालयानी या ‘भारतपोल’ची निर्मिती केली आहे.
‘भारतपोल’ गुन्हेगारांविरोधात काम करेल
आता भारतात आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांना जाळ्यात अडकवण्यासाठी आणि त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी गृह मंत्रालय ‘भारतपोल पोर्टल’ सुरू करणार आहे. गृहमंत्री अमित शहा आज म्हणजेच ७ जानेवारीला या पोर्टलचे लोकार्पण करणार आहेत. हे पोर्टल सीबीआयच्या अंतर्गत काम करणार आहे. ‘भारतपोल’च्या निर्मितीमुळे गुन्हेगारांविरोधातील कारवाई अधिक कडक होणार असून सुरक्षा दलांना त्याचा मोठा उपयोग होणार आहे.
‘भारतपोल’ म्हणजे काय? Bharatpol ।
‘भारतपोल’चा उद्देश गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणे हा आहे. सीबीआयने तयार केलेले हे प्रगत ऑनलाइन पोर्टल आहे. या पोर्टलच्या माध्यमातून देशातील सर्व सुरक्षा यंत्रणांना गुन्ह्यांवर कारवाई करण्यात मोठी मदत होणार आहे. एवढेच नाही तर भारतपोलच्या माध्यमातून रेड नोटीस, डिफ्यूजन नोटीस आणि इतर महत्त्वाच्या इंटरपोल नोटीस जारी करण्याची प्रक्रिया वेगवान केली जाईल. याशिवाय राज्य पोलीस सीबीआयकडून जी काही माहिती मागतील त्याची स्थितीही याठिकाणावरून मिळण्यास मदत होणार आहे.
सुरक्षा यंत्रणांसाठी हे कितपत फायदेशीर आहे?
एखादा गुन्हेगार परदेशात जाऊन लपतो, अशा परिस्थितीत पोलिसांना त्याची माहिती मिळवण्यासाठी इंटरपोलची मदत घ्यावी लागते. पण कोणत्याही राज्याचे पोलीस थेट इंटरपोलची मदत घेऊ शकत नाहीत. त्यासाठी पोलिस खात्याला या प्रकरणाची माहिती देऊन सीबीआयकडे दाद मागायची आहे. त्यानंतर सीबीआय स्वत: प्रकरणाचा तपास करते आणि अहवाल पाठवते. या संपूर्ण प्रक्रियेसाठी बराच वेळ लागतो आणि लांबलचक कागदपत्रांची आवश्यकता असते. त्यामुळेच आता भारतपोलच्या येण्याने सर्व सुरक्षा यंत्रणांना मदत होणार आहे.





