‘भरत-सिद्धार्थ’ची जोडी एकत्र; आता थांबायचं नाय! चित्रपटाच्या ट्रेलरने उत्सुकता वाढवली!

Don’t wait any longer Marathi movie trailer | सत्यकथेवर आधारित ‘आता थांबायचं नाय!’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटातील आता थांबायचं नाय हे गाण काही दिवसांपूर्वीच रिलीज झालं होतं. या गाण्यामुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली होती. अखेर चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्याने आता खऱ्या अर्थाने प्रेक्षकांची चित्रपट पाहण्यासाठीची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
हा चित्रपट संघर्ष, जिद्द आणि यशाची गाथा मांडतो, जो प्रत्येक मराठी कुटुंबातील व्यक्तीने पाहण्यासारखा आहे. दिग्दर्शक शिवराज वायचळ यांनी दिग्दर्शित केला आहे. तर उमेश कुमार बन्सल, बवेश जानवलेकर, नितीन हिरानंदानी, धरम वालिया हे चित्रपटाचे निर्माते आहेत. चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांमध्ये उत्साह निर्माण केला असून, हा चित्रपट १ मे २०२५ रोजी महाराष्ट्र दिनी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटाची कथा मुंबईत घडताना दाखवण्यात आली आहे. मुंबई महापालिकेतील चतुर्थ श्रेणीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची ही गोष्ट आहे. या चित्रपटातील सर्वच पात्रांच्या भूमिका विशेष आहेत. या कर्मचाऱ्यांना दहावीची परीक्षा देण्यासाठी सांगितले जाते. ही परीक्षा देण्यासाठी हे कर्मचारी कशापद्धतीने मेहनत घेतात हे दाखवण्यात आले आहे.
एकाअर्थाने या चित्रपटातून शिक्षणाचे महत्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हे सारं होत असताना या कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील घटनांचे चित्रण दाखवण्यात आले आहेत. यामुळे हे कर्मचारी दहावीची परीक्षा पास होतात का? या उत्तरासाठी हा चित्रपट पाहवा लागेल. यामुळेच चित्रपटाच्या टीमने १ मे या दिवशीचे औचित्य साधून आता थांबायचं नाय हा चित्रपट रिलीज करण्याचे ठरवले आहे.
या चित्रपटात अभिनेता भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव यांची जोडी बऱ्याच दिवसांनी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. याशिवाय, आशितोष गोवारीवकर, ओम भुतकर आणि इतर अनेक कलाकारांच्या देखील महत्वाच्या भूमिका असणार आहेत.





