भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त रा.स्व. संघातर्फे अभिवादन

पुणे- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागात विविध अभिवादन कार्यक्रमांचे आयोजन केले. पुणे रेल्वे स्टेशन येथे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. पुणे महानगर संघचालक रविंद्र वंजारवाडकर आणि प्रांतातील अधिकारी उपस्थित होते. पिंपरी चौकात संघ कार्यकर्त्यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करत त्याचे रक्षण करण्याचा संकल्प घेतला. यावेळी जिल्हा संघचालक विनोद बन्सल, कार्यवाह नरेंद्र पेंडसे, अनिल सौंदडे, विलास लांडगे आदी उपस्थित होते.
बारामती, औंध, सिंहगड आणि पर्वती भागातही पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले. येरवडा आणि बोपोडी येथील बुद्ध विहारांना भेटी देत स्वयंसेवकांनी समरसता जोपासली. पिंपरीत तात्या बापट स्मृती समितीने ३० वर्षांपासून सुरू असलेली पाणपोई सेवा यंदाही दिली. ‘एक वही, एक पेन’ उपक्रमात १,५०० वह्या-पेन भारतीय बौद्धजन विकास समितीला सुपूर्द करण्यात आले.
मोतीबाग, शनिवार पेठ येथे RSS, भारतीय संस्कृती संवर्धक संस्था आणि कसबा भाग यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन झाले. १११ जणांनी रक्तदान केले. ज्ञानदीप अकॅडमीचे संचालक महेश शिंदे यांनी उद्घाटनप्रसंगी बाबासाहेबांचा “शिका, संघटित व्हा, संघर्ष करा” हा मंत्र स्पष्ट केला. “संघर्ष म्हणजे स्वतःतील उणिवांवर मात करत कौशल्ये आत्मसात करणे,” असे ते म्हणाले. शिबिर संयोजक सागर दरेकर, राजीव जोशी, प्रसाद खेडकर आणि जनकल्याण रक्तकेंद्राच्या टीमने यशस्वी आयोजन केले.
कोल्हापूरात बिंदू चौक, लक्षतीर्थ वसाहत आणि विचारे मळा येथे अभिवादन कार्यक्रम झाले. प्रमोद ढोले, सुनील वांकर, संतोष अतिग्रे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमांनी बाबासाहेबांचे समता आणि बंधुत्वाचे विचार पुन्हा एकदा अधोरेखित केले.





