Bharat Jodo Yatra: भारत जोडो यात्रेच्या स्वागताची UPत जय्यत तयारी, सरकारच्या “कुशासनाची” जनतेला करून देणार जाणीव

लखनौ – राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेची उत्तर प्रदेशमध्ये सध्या जोरात तयारी सुरू झाली आहे. ही यात्रा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करेल आणि भाजप सरकारच्या “कुशासनाची” जनतेला जाणीव करून देईल, अशी आशा कॉंग्रेस नेत्यांना आहे. 3 जानेवारीला ही यात्रा उत्तर प्रदेशच्या हद्दीत प्रवेश करणार आहे.
ती 5 जानेवारीला येथून हरियाणात प्रवेश करणार आहे. दरम्यानच्या कालावधीत ही यात्रा उत्तर प्रदेशात 120 किमीचे अंतर पार करणार आहे. यात्रा 3 जानेवारी रोजी दिल्लीच्या काश्मिरी गेटमधील हनुमान मंदिरापासून पुन्हा सुरू होईल आणि दुपारच्या सुमारास उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये प्रवेश करेल.
बागपतमधील माविकला गावात रात्रीचा मुक्काम असेल. 4 जानेवारीला उत्तर प्रदेशातील शामली मार्गे यात्रा जाईल आणि 5 जानेवारीला संध्याकाळी पानिपतमधील सनौलीतून हरियाणात प्रवेश करेल. यात्रेच्या यशस्वीतेसाठी कॉंग्रेस कार्यकर्ते ओव्हरटाईम काम करत आहेत. पक्षाच्या बागपत जिल्हा शाखेचे अध्यक्ष युनूस चौधरी म्हणाले की, यात्रेचे दुंडाहेरा चेकपोस्टवर स्वागत केले जाईल आणि 3 जानेवारी रोजी माविकला गावात रात्रभर पदयात्रा थांबेल. तेथे सुमारे 2,000-2,500 लोकांच्या राहण्याची व्यवस्था केली जात आहे, असेही ते म्हणाले.
उत्तर प्रदेशातील या यात्रेसाठी राज्यातील सर्व 75 जिल्ह्यांतून पक्षाचे कार्यकर्ते यावेत, यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असे कॉंग्रेस नेते पी. एल. पुनीया यांनी सांगितले. कॉंग्रेस नेत्या आणि पक्षाच्या उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियांका गांधी या उत्तर प्रदेशातील संपूर्ण यात्रेत सहभागी असणार आहेत.





