पोषण आहारावर भरारी पथकांची नजर; अनियमितता आढळल्यास कारवाईचे सूचवण्याचे अधिकार

पुणे – शालेय विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचा पोषण आहार दिला जावा, यासाठी भरारी व दक्षता पथके स्थापन करण्यात आलेली आहेत. या पथकांनी शाळांवर “वॉच’ ठेवण्यासह वस्तूनिष्ठ अहवाल सादर करणे बंधनकारक आहे. विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती वाढावी, गळतीचे प्रमाण कमी व्हावे, सकस आहार मिळावा यासाठी ही योजना राबविण्यात येते.
यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून वर्षाला 1,700 कोटी रुपयांचा निधी दिला जातो. या योजनेअंतर्गत 86 हजार 500 शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या 1 कोटी 3 लाख विद्यार्थ्यांना आहाराचा लाभ मिळवून देण्यात येतो. याच्या तपासणीसाठी सर्व मनपा आयुक्त, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नगरपालिका व नगरपरिषदांचे मुख्याधिकारी, शिक्षण उपसंचालक यांना भरारी पथके नियुक्त करण्याबाबत शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी सूचना दिल्या आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये दरमहा किमान 10 शाळांची तपासणी पथकामार्फत करावी लागणार आहे.
“प्रमुख अधिकाऱ्यांनी शाळांना महिन्यातून किमान दोन भेटी देऊन त्याचा अहवाल सादर केला पाहिजे. भरारी पथकांनी शाळा तपासणी केलेल्या शाळांच्या संख्येबरोबरच शाळांची नावेही सादर करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. पथकांनी खरच शाळांची तपासणी केली का, याची फेरपडताळणीही करण्यात येणार आहे.” – शरद गोसावी, संचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय





