Bhandarkar Institute :भांडारकर संस्थेच्या माहितीपटाचा ऐतिहासिक ठेवा
Bhandarkar Institute :

चित्रपट संग्रहालयाकडून डिजिटल प्रत सन्मानपूर्वक हस्तांतरित
Bhandarkar Institute : भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या कार्यावर तयार केलेल्या माहितीपटाची डिजिटल प्रत राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडून रविवारी भांडारकर संस्थेला सन्मानपूर्वक हस्तांतरित करण्यात आली.
हा माहितीपट संस्थेच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त ख्यातनाम निर्माते दिनकर जोशी यांनी १९६७ मध्ये तयार केला होता. नानी शहापूरकर त्याचे दिग्दर्शक होते. भांडारकर संस्थेच्या मानद सचिवपदी तेव्हा ख्यातनाम संशोधक पद्मभूषण डॉ. रा. ना. दांडेकर हे होते.
१९६९ मध्ये सेन्सॉरसंमत झालेल्या माहितीपटाची प्रत राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक प्रकाश मगदूम यांनी संस्थेचे कार्याध्यक्ष भूपाल पटवर्धन यांच्याकडे सुपूर्द केला. या वेळी चित्रपट संग्रहालयाचे व्यवस्थापक भावेश सिंग, भांडारकर संस्थेच्या व्यवस्थापनाचे सदस्य सुनील भंडगे, मनोज एरंडे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे आदी उपस्थित होते.
तीन ते चार दिवस हे काम सुरू होते आणि त्याविषयी मोठे औत्स्युक्य होते, असे इंग्रजी माहितीपटाच्या चित्रीकरणाचे प्रत्यक्षदर्शी ज्येष्ठ संशोधक डॉ. ग. उ. थिटे यांनी सांगितले. सध्याच्या चित्रपट संग्रहालयाची जागा ही डॉ. मु. रा. जयकर यांची आहे. डॉ. जयकर पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू होते.
त्या वेळी भांडारकर संस्थेच्या जागेतच १९४९ मध्ये पुणे विद्यापीठाची स्थापना झाली. त्यामुळे डॉ. जयकर, चित्रपट संग्रहालय आणि भांडारकर संस्थेचे जुने ऋणानुबंध आहेत. या माहितीपटाच्या प्रती सन २००३ मध्ये जोशींनी भांडारकर संस्थेकडे सुपूर्द केल्या होत्या. नंतर २००८ मध्ये त्याचे योग्य जतन होण्यासाठी चित्रपट संग्रहालयाला दिल्या, अशी माहिती संस्थेचे निबंधक डॉ. श्रीनन्द बापट यांनी दिली.
गेली १९ वर्षे फिल्म संग्रहालयाने जतन केल्यामुळेच या माहितीपटाचे डिजिटायझेशन होऊ शकले, असे पटवर्धन म्हणाले. संस्थेच्या ज्ञानभारतम् केंद्राच्या समन्वयक डॉ. वीणा राज यांनी या डिजिटायझेशनसाठी पुढाकार घेतला.





