Pune News – आपल्या देशातील प्राचीन इतिहासाचे दस्तऐवज, साहित्यांचे, स्मारकांचे संरक्षण आणि संवर्धन होणे आवश्यक आहे. ज्यासाठी भांडारकरसारख्या संस्था वर्षानुवर्षे चिकाटीने काम करीत आहेत, अशा कार्याला सरकारबरोबरच समाजाच्या दातृत्वाचीदेखील गरज असल्याचे मत पुणे महापालिकेच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी व्यक्त केले. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर संस्थेच्या संग्रहातील महत्त्वाची हस्तलिखिते, ग्रंथ आणि मौल्यवान वस्तूंचा तसेच संशोधन प्रकल्पांचा समावेश असलेल्या “ज्ञानसागर” प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी खेलरत्न पुरस्कार विजेत्या ऑलिम्पिकपटू नेमबाज अंजली भागवत, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. स्मिता लेले, संस्थेचे अध्यक्ष अभय फिरोदिया, कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष भूपाल पटवर्धन, मानद सचिव प्रा. सुधीर वैशंपायन, विश्वस्त प्रदीप रावत उपस्थित होते. यावेळी महाभारत-सांस्कृतिक सूची या संशोधन प्रकल्पातील भीम या पुस्तकाचे प्रकाशनही महापौर यांच्या हस्ते करण्यात आले. येत्या २३ फेब्रुवारीपर्यंत प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे. संशोधक तयार होण्यासाठी अशा प्रकारच्या प्रदर्शनांची गरज आहे. त्यामुळे तरुणांना या क्षेत्रात येण्याचे प्रोत्साहन मिळेल, असे मंजुषा नागपुरे यांनी सांगितले. जगातील सर्वात मोठे भांडार असलेली तिजोरी म्हणजे भांडारकर संस्था आहे. या संस्थेकडे असलेला प्राचीन साठा बहुमूल्य आहे, त्याचे सर्व समाजाला दर्शन व्हावे यासाठीचा हा ज्ञानसागर प्रदर्शनाचा उपक्रम स्तुत्य असल्याचे अंजली भागवत यांनी सांगितले. संशोधनाच्या क्षेत्रात गेली १०८ वर्षे कार्यरत असणार्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर संस्थेच्या कार्यात तरुणांचा सहभाग वाढला पाहिजे, असे अभय फिरोदिया यांनी सांगितले. समन्वयक मनोज एरंडे यांनी स्वागत, श्रीनन्द बापट यांनी सूत्रसंचालन तर संतोष रासकर यांनी आभार मानले.